इम्फाळ, 7 मे : मणिपूरमध्ये 3 मे पासून सुरू असलेल्या हिंसाचारामध्ये आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्य सरकारच्या सुरक्षा सल्लागारांनी दिली आहे. इम्फाळमध्ये रविवारी जनजीवन सामन्य झालं. दुकानं आणि बाजार उघडण्यात आले, तसंच रस्त्यावर गाड्या फिरतानाही दिसत होत्या. हिंसा प्रभावित चुराचांदपूर जिल्ह्यात रविवारी सकाळी 3 तास कर्फ्यू उठवण्यात आला होता.
मणिपूरमधला हिंसाचार रोखण्यासाठी भारतीय सेना आणि आसाम रायफल्सना बोलावण्यात आलं, त्यांनी आतापर्यंत 23 हजार नागरिकांना ऑपरेटिंग बेसमध्ये सुरक्षित नेलं आले. तसंच मणिपूरमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांनाही सुरक्षित स्थळी नेण्याचं आव्हान लष्करापुढे आहे.
मणिपूरमध्ये महाराष्ट्रातले 12 विद्यार्थी अडकले आहेत, त्यामुळे या विद्यार्थ्यांचे पालक चिंतेत आहेत. या पालकांनी गोविंद बागेत जाऊन शरद पवारांची भेट घेतली आणि त्यांची व्यथा मांडली. शरद पवारांनी पालकांना मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आश्वासन दिलं. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मणिपूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांशी फोनवरून संवाद साधला. तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही सरकारला पत्र लिहून विद्यार्थ्यांना सुरक्षित आणण्याचं आवाहन केलं.
मणिपूरमध्ये हिंसाचार कसा भडकला?
मणिपूरच्या एकूण लोकसंख्येपैकी मेइती समुदायाची लोकसंख्या 53 टक्के आहे, यातले बहुतेक जण इम्फाळ घाटीमध्ये राहतात. आदिवासींमध्ये नगा आणि कुकी यांचा समावेश आहे आणि त्यांची लोकसंख्या जवळपास 40 टक्के आहे, यातली बहुतेक लोकसंख्या पहाडी जिल्ह्यांमध्ये वास्तव्यास आहे.
मणिपूरमध्ये बहुसंख्य असलेल्या मेइती समाजाने त्यांना अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) दर्जा मिळावा अशी मागणी केली आहे. या मागणीविरोधात ऑल ट्रायबल स्टुटंड युनियन मणिपूर (एटीएसयूएम) ने आदिवासी एकजुटता मार्चचं आयोजन केलं. एटीएसयूएमच्या मार्चवेळी चुराचांदपूर जिल्ह्याच्या तोरबंग भागात हिंसा भडकली. या हिंसेचं लोण मणिपूरमध्ये पसरलं.
मेइती समाजाला एसटी दर्जा देण्याच्या मागणीवर चार आठवड्यात केंद्र सरकारला शिफारस द्यावी, असे निर्देश मणिपूर हायकोर्टाने राज्य सरकारला मागच्या महिन्यात दिले. हायकोर्टाच्या या आदेशानंतर नगा आणि कुकी यांच्यासह आदिवासी समाजाने मार्चचं आयोजन केलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तोरबंगमध्ये मार्च सुरू असताना सशस्त्र आलेल्या गर्दीने मेइती समाजाच्या सदस्यांवर हल्ला केला, या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यात आलं, ज्यामुळे संपूर्ण राज्यात हिंसाचार पसरला, असा पोलिसांचा प्राथमिक अहवाल आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.