मुंबई, 17 मे : महाविकास आघाडीने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. त्यासाठी महाविकास आघाडीतील तीनही प्रमुख पक्षांचे प्रत्येकी दोन नेते असलेली एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. महाविकास आघाडीची हीच समिती 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांत तीन पक्षांसाठी जागावाटप ठरवणार आहे.
या समितीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते अजीत पवार तर काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि नेते अशोक चव्हाण यांची नावे अंतीम झाली आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाकडून खासदार संजय राऊत यांच्यासोबत दूसरा नेता कोण असणार? यासाठी ठाकरे गटात जोरदार रस्सीखेच सुरू असल्याची माहिती वरिष्ठ सुत्रांकडून मिळत आहे.
शिवसेना ठाकरे गटातर्फे महाविकास आघाडीच्या निवड समितीवर संजय राऊत यांच्यासोबत दुसरा नेता म्हणून वर्णी लागावी यासाठी सुभाष देसाई, अनिल देसाई, अरविंद सावंत, विनायक राऊत आणि आदित्य ठाकरे या नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याची माहीती समोर येत आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
ठाकरे गटाकडून या पाच नेत्यांची नावं सध्या चर्चेत आहेत. मात्र त्यापैकी सुभाष देसाई यांचे चिरंजीव भूषण देसाई शिंदे गटात गेल्यामुळे त्यांच्याबद्दल तीव्र नाराजी ठाकरे गटात आहे. त्यामुळे त्यांच्या नावाला मोठा विरोधही होताना पहायला मिळतोय. समितीच्या दूसऱ्या जागेसाठी होणारी रस्सीखेच पहाता शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.