जळगाव, 30 एप्रिल : दोन दिवसांपासून राज्यातील बाजार समितींच्या निवडणुकांसाठी मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत अनेक बाजार समितीच्या निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. अनेक ठिकाणी दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर काही ठिकाणी अनपेक्षित विजयाची नोंद झाल्याचं देखील पहायला मिळत आहे. दरम्यान आज जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीने दणदणीत विजयाची नोंद केली आहे. हा निकाल म्हणजे शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
जळगावमध्ये युतीला धक्का
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीनं बाजी मारली आहे. महाविकास आघाडीनं 18 पैकी 10 जागांवर विजय मिळवला आहे. भाजप शिंदे गटाला अवघ्या सात जागांवर समाधान मानाव लागलं तर एका जाग्यावर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे. या निवडणुकीत गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. विशेष म्हणजे या निवडणुकीत शिंदे गटाच्या तालुका प्रमुखाचा देखील पराभव झाला आहे. शिवसेना शिंदे गटाचे जळगाव तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण यांचा पराभव झाला आहे.
तुमच्या शहरातून (नाशिक)
पारोळ्यातही शिंदे गटाला धक्का
पारोळा बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी घेतली आहे. 18 जागांपैकी 15 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर अवघ्या तीन जागांवर शिवसेनेला समाधान मानावं लागलं आहे. शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार डॉक्टर सतीश पाटील यांच्या पॅनलचा या ठिकाणी विजय झाल आहे. विजयानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.