मुंबई : मशिदीवरील भोंगे उतरवले गेले नाही, तर मंदिरांवर हनुमान चालीसाचे भोंगे दुप्पट आवाजात वाजवा, असा आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिला. त्यानंतर काही ठिकाणी त्याची अमलबजावणीही झाली. त्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले. राज ठाकरे त्यांची भूमिका झेंड्यांतील रंगाप्रमाणे बदलतात, अशी टिका करून महाराष्ट्राची जनता दुधखुळी नाही, हे राज ठाकरेंनी ध्यानात घ्यावे, असा सल्ला राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी त्यांना दिला आहे.
राज ठाकरेंवर टिका करताना मंत्री वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, शिवसेनेचा इतिहास मोठा आहे. महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi Government) तिन्ही पक्षाचा व्यक्तिशः अजेंडा वेगळा आहे. पण राज ठाकरे (Raj Thackeray) त्यांची भूमिका झेंड्यातील रंगा प्रमाणे बदलतात. किती वेळा भूमिका राज ठाकरे यांनी बदलली आहे. पण जनता दुधखुळी नाही, त्यांना सर्व कळते. भाजप सरकारच्या काळात मशिदींवर भोंगे नव्हते का, असा प्रश्न करीत राज ठाकरे यांची भूमिका समाजात भांडण लावणारी आहे, असे ते म्हणाले. दंगलीत जाणारा राजकारण्याचा पोरगा नसतो, तर तेव्हा कार्यकर्त्याला पुढे केले जाते. त्यामुळे नुकसान कुणाचे होते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. समाज जोडणारी भूमिका असावी, देश तोडणारी भूमिका नको, असेही ते म्हणाले.
होऊ द्या चौकशी..
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत बोलताना वडेट्टीवार म्हणाले, व्यक्तिगत द्वेष भूमिका कोणी ठेवता कामा नये. लोकशाहीला हे पोषक नाही. कायदा आणि न्यायालयात दूध का दूध पाणी का पाणी होईलच. राजकारणात मतभेद होऊ शकतात, पण द्वेष भावना कुणी ठेवू नये. आता सीबीआय चौकशी पण होऊ द्या. अनिल देशमुख, त्यांचे सहकारी आणि नातेवाइकांवर ९० धाडी टाकल्या, त्यांच्या हाती काय लागले, हे माहिती नाही. त्यामुळे होऊच द्या चौकशी, न्यायालयात सर्व सत्य सिद्ध होईल.
गृह खात्यावर कॉंग्रेस नाराज नाही..
गृह खात्याच्या कारभारावर कॉंग्रेस नाराज आहे, अशी ओरड सातत्याने केली जात आहे. याबाबत विचारले असता, गृह खात्यावर कॉंग्रेस नाराज नाही. कुणी बोलले असतील तर त्यांचा वैयक्तिक भूमिका असू शकते. ती पक्षाची भूमिका आहे, असा समज करण्याची काही कारण नाही, असेही ते म्हणाले.
चुकीचा अर्थ लावणे योग्य नाही..
दोन मोठ्या नेत्यांच्या भेटीचा चुकीचा अर्थ लावणे योग्य नाही. मोदी भाजपचे नाही, तर देशाचे पंतप्रधान आहेत, अशा दृष्टीने बघितले पाहिजे. शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्यात काय चर्चा झाली याचे अंदाज वर्तवणे चुकीचे आहे. या भेटीकडे सकारात्मक बघावे. जनतेच्या हितासाठी चर्चा झाली असावी. देशातील महागाईबाबत या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली असावी. निवडणुकीच्या आधी एक आणि नंतर एक, अशा पद्धतीने महागाई वाढत आहे. त्यामुळे जनतेच्या भावना आणि त्यावर उपाय योजना यावर शरद पवारांनी मोदींना सूचना केली असेल, असे मंत्री वडेट्टीवार म्हणाले.
केंद्राला सवलती द्याव्या लागतील..
महागाई रोखण्यासाठी केंद्राला सवलती द्याव्या लागतील. सामान्य माणसाच्या हिताकडे सध्या दुर्लक्ष होत आहे. याबाबतही मोदी-पवार चर्चा असू शकते. महागाईवर उपाययोजना झाली नाही तर आपली स्थिती श्रीलंकेसारखी व्हायला वेळ लागणार नाही, असेही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.