जितेंद्र जाधव, प्रतिनिधी
बारामती, 7 एप्रिल : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याला कारण ठरलं आहे अजित पवारांचा एक निर्णय. विरोधी पक्षनेते असलेल्या अजित पवार यांनी त्यांचे उद्याचे सगळे कार्यक्रम रद्द केलं आहे. अजित पवारांनी अचानक हा निर्णय का घेतला? याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अजित पवारांना शरद पवारांचा फोन आला, त्यानंतर अजित पवारांनी सगळे कार्यक्रम रद्द केले, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. आज दुपारीच अजित पवारांनी त्यांचा कॉनवॉय आणि स्टाफ सोडला आणि ते खासगी गाडीने रवाना झाले आहेत, पण अजित पवार नेमके कुठे गेले आहेत, याबाबत माहिती मिळू शकलेलं नाही.
अजित पवार मांजरीमधील कार्यक्रमाला जात होते, पण तिकडे जात असतानाच त्यांचे कार्यक्रम रद्द करण्यात आले. येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यातच आता अजित पवारांनी अचानक त्यांचे उद्याचे सगळे कार्यक्रम रद्द केले आहेत.
तुमच्या शहरातून (पुणे)
महाराष्ट्रात 2019 च्या सत्तासंघर्षामध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला धक्का देत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. तेव्हापासून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मैत्रीची चर्चा होते. महाविकासआघाडीकडून मागच्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत, पण अजित पवारांनी याबाबत वेगळी भूमिका घेतली. 2014 साली देशाच्या जनतेने पंतप्रधान मोदींना डिग्री पाहून निवडून दिलं नाही, असं विधान केलं.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल कधीही अपेक्षित असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 9 एप्रिल म्हणजेच रविवारी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. यासाठी आजच ठाणे आणि नाशिकवरून शिवसैनिक अयोध्येला रवाना झाले आहेत. शिवसैनिक अयोध्येला जात असताना स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे रेल्वे स्टेशनवर आले होते. मुख्यमंत्र्यांनी भगवा झेंडा दाखवल्यावर ठाणे रेल्वे स्टेशनवरून ट्रेन अयोध्येला रवाना झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.