महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्र सक्षम करण्याचे उद्दिष्ट साध्य करीत असताना सर्वसामान्यांना गुणवत्तापूर्ण आणि किफायतशीर दरात वैद्यकीय सेवा देणे याला राज्य शासनाची प्राधान्यता आहे. आगामी काळात #आयएचजी अर्थात इंटरनॅशनल हॉस्पीटल्स ग्रुप यांनी यासाठी पुढे येऊन महाराष्ट्राला सहकार्य करावे असे आवाहन केले.
राज्यातील आरोग्य व्यवस्थेसंदर्भातील बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती.
महाराष्ट्रात सर्वंसामान्यांना किफायतशीर दरात आणि गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा देण्यासाठी शासन काम करीत आहे. हे करण्यासाठी येणाऱ्या काळात राज्यात सुपरस्पेशालिटी रुग्णालये, चांगल्या वैद्यकीय सेवा सुविधांचे जाळे विकसित करणे आणि या सेवा सर्वसामान्यांना किफायतशीर दरात उपलब्ध करणे यावर राज्य शासनाचा भर आहे. आजच्या काळात अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारीत चांगले निदान तपासणी केंद्र सुरु करणे हे आवश्यक आहे. भारतासारख्या आणि महाराष्ट्रात लोकसंख्येची घनता अधिक असल्याने साथीच्या रोगांचा अधिक धोका असतो. याचा अनुभव नुकताच कोविड महामारीच्या वेळी अनुभवला आहे. भविष्यात महाराष्ट्रातील वैद्यकीय यंत्रणा सक्षम आणि सुदृढ करण्यासाठी दीर्घकालीन नियोजन करणे गरजेचे आहे. यशस्वी आणि दीर्घकालीन वैद्यकीय सुविधा निर्माण करणे, पीपीपी तत्वावर वैद्यकीय यंत्रणा उभारणे यावर भर देण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील तृतीयक आरोग्य सेवेसाठी (Tertiary Healthcare Services) पायाभूत सुविधा आणि वैद्यकीय शिक्षण सुविधांच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाचे रणनीतिक सल्लागार म्हणून आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेला (आयएफसी) करारबद्ध करण्यात आले आहे. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रूग्णालय स्थापन करण्यासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP) धोरण राज्य शासनाने ठरविले आहे. आयएचजी कंपनी 1978 पासून आरोग्य क्षेत्रात काम करीत आहेत. तर 55 देशातील 450 हून अधिक आरोग्य प्रकल्पांवर या संस्थेने काम केले आहे. महाराष्ट्रात आरोग्य सेवांचे बळकटीकरण आणि सुलभीकरण करण्यासाठी या कंपनीने आतापर्यंत केलेल्या अनुभवाचा फायदा होणार असल्याने आयएचजी यांनी सहभाग नोंदवावा असेही यावेळी सांगितले.
या बैठकीला वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, उपसचिव प्रकाश सुरवसे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.