पुणे, 26 एप्रिल : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय असल्याने राज्यात मागच्या काही दिवसांपासून वादळी पावसासह गारपीट होत आहे. दरम्यान एप्रिलच्या शेवटीही पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. वादळी पाऊस आणि गारपीट होत असली तरी उन्हाचा चटका कायम असल्याने राज्यात उन्हाच्या झळा बसत आहेत. मागच्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे राज्याचील हजारो हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाला पोषक हवामान असल्याने जोरदार पावसाची शक्यता आहे. आज (दि. 26) राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तर विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात गारपिटीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कमाल तापमानातील चढ-उतार कायम राहण्याचा शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.
तुमच्या शहरातून (पुणे)
बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून 1.5 किमी उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. याचा फटका पश्चिम विदर्भ आणि परिसरावर होणार आहे. या प्रणालीपासून, मराठवाडा, अंतर्गत कर्नाटकपर्यंत समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा व खंडीत वाऱ्यांची स्थिती कायम आहे.
वादळी पावसाला पोषक वातावरण झाल्याने आज (दि. 26) मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, आणि विदर्भातील बुलढाणा, अमरावती, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात गारपीट आणि वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यात वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर
पालघर, ठाणे, रायगड, मुंबई, रत्नागिरी, नंदूरबार, धुळे, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, धाराशिव, लातूर, नांदेड, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली यलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात कमाल तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. उन्हाचा चटका आणि उकाडाही कायम आहे. दरम्यान मागच्या 24 तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी 39.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यासह, वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकण वगळता राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान 35 ते 39 अंशांच्या दरम्यान आहे. कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.
उन्हाळयात पाण्यात टाकून प्या हे पदार्थ, डिहायड्रेशन आणि उष्माघातापासून होईल रक्षण!
पुणे 37.4 (17.6), कोल्हापूर 36.6 (21.9), महाबळेश्वर 31.2 (17.9), नाशिक 37.3 (20.2), निफाड 38 .4 (16.6), सांगली 38.2 (22.3), सातारा 36.8 (21.6), सोलापूर 39.5 (23.5), सांताक्रूझ 32.7 (26.0), डहाणू 33 .1 (24.4), रत्नागिरी 32.6 (23.7), छत्रपती संभाजीनगर 37.7 (20.2), नांदेड 37.4 (26.2), परभणी 39.0 (26.6), अकोला 39.8 (22.2), अमरावती 39.6 (23.5), बुलडाणा 36.4 (21.4), ब्रम्हपूरी 37.4 (23.5), चंद्रपूर 36.0 (22.4), गडचिरोली 34.4 (22.4), गोंदिया 36.4 (23.6), नागपूर 35.9 (23.4), वर्धा 38.5 (24.2), यवतमाळ 37.5 (24.5) तापमानाची नोंद झाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.