नवी दिल्ली, 13 एप्रिल : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीमध्ये काँग्रेस नेत्यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांची काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि केसी वेणुगोपाल यांच्यासोबत दिल्लीमध्ये बैठक झाली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी ही बैठक घेण्यात आली.
‘देशाला वाचवण्यासाठी आणि लोकशाहीला वाचवण्यासाठी, संविधानाला सुरक्षित ठेवण्यासाठी, तरुणांना नोकऱ्या आणि महागाई या मुद्द्यांवर एकत्र लढण्यासाठी आम्ही तयार झालो आहोत. आम्ही एक-एक करून सगळ्यांसोबत चर्चा करू. काल दोन पक्षांची भेट झाली होती, आज शरद पवार आले आहेत. एकत्र पुढे जायचा प्रयत्न करू’, असं पवार म्हणाल्याचं खर्गेंनी सांगितलं.
‘खर्गेंनी सांगितले तेच आमचे विचार आहेत. पण नुसते विचार असून फायदा नाही, ही प्रक्रिया सुरू करणं गरजेचं आहे. ही सुरूवात आहे, यानंतर बाकीचे पक्ष या प्रक्रियेत येऊ शकतात. अजून ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल यांच्यासोबत चर्चा झाली नाही, पण तेही यात येऊ शकतात. सगळे एकत्र येणं गरजेचं आहे, त्यामुळे आमच्यातले काही जण हे काम पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील’, असं शरद पवार म्हणाले.
विरोधकांना एकत्र आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सगळे पक्ष यासाठी कटिबद्ध आहेत, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.