ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी
बेळगाव, 13 मे : कर्नाटकात काँग्रेसने बाजी मारली असली तरी सीमाभागात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. या भागात मराठी अस्मिता असलेल्या एकीकरण समितीने पाच उमेदवार दिले होते. त्यापैकी काही उमेदवार विजयी होतील, असा अंदाज होता. मात्र, या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा सुफडसाफ झाला. रमाकांत कोंडुस्कर आणि आर एम चौगले वगळता इतर उमेदवारांना दहा हजारांचाही टप्पा गाठता आला नाही.
सीमाभागात मराठी अस्मिता म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीकडे पाहिले जात होते. जिल्ह्यात 18 जागांपैकी कधीकाळी सहा जागा समितीकडे असायच्या आता मात्र मतांच्या बेरजेत समिती मागे पडताना दिसत आहे. सीमा लढ्यात नव्या पिढीचे कमी झालेले प्रमाण, राष्ट्रीय पक्षांचा बेळगावात वाढलेला प्रभाव आणि सीमालढ्याचा प्रश्न न सुटता त्याचे सुरू असलेली राजकारण अशी काही कारणे यामागे आहेत. मात्र, महाराष्ट्राच्या नेत्यांनी एकीकरण समितीच्या उमेदवरांच्या विरोधात प्रचार केला म्हणून समितीचा पराभव झाल्याचे म्हणत एकीकरण समितीने महाराष्ट्राच्या नेत्यांवर पराभवाचे खापर फोडलंय.
वाचा – Karnataka Election : कर्नाटक निकालानंतर महाराष्ट्रात घडामोडींना वेग; ठाकरे गटाची खलबतं
बेळगावात सध्या राष्ट्रीय पक्षांचा प्रभाव वाढू लागला आहे. या निवडणुकीत काँग्रेसने 11 तर भाजपने 7 जागा जिंकल्या आहेत. यावरून सीमाप्रश्न आणि मराठी अस्मिता बाजूला पडल्याचे पहायला मिळते. मात्र, सीमाप्रश्नाचे केवळ राजकारण होत असून सर्वोच्च न्यायालय काय तो यावर निर्णय देईल असे मत एकीकरण समितीच्या उमेदवाराचा पराभव करून विजयी झालेल्या अभय पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीला नेहमीच महाराष्ट्राने पाठबळ देत मोठे केलं आहे. या समितीला राजकारणात मात्र महाराष्ट्राचे नेते साथ देत नाहीत त्यामुळे समितीने आता स्वबळावर या निवडणुका लढवण्याची गरज आहे. मात्र, असं करत असतानाच सीमालढ्यापासून नवी पिढी दूर होत आहे, याचेही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. नाहीतर अस्मितेची लढाई करता करता एकीकरण समितीला अस्तित्वाच्या लढाईसाठी झगडावे लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.