स्वप्निल घाग, नवी दिल्ली, 01 मे : राज्यात सर्वत्र महाराष्ट्र दिनाची धूम सुरू असताना तिकडे सातासमुद्रापार देखील महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. आखाती देशातील एकमेव पारंपरिक ढोल ताशा पथक असलेल्या त्रिविक्रम ढोल ताशा पथकाने आगळ्या वेगळ्या पद्धतीने महाराष्ट्र दीन साजरा केलाय. एका लक्झरी योट वर पर्शियन समुद्रात जगातील एकमेव 7 स्टार हॉटेल बुर्ज अल अरब च्या समोर पाण्यामध्ये ढोल ताशे वाजवत महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.
त्रिविक्रम ढोल ताशा पथक दुबई, हे आखाती देशातील पहिले व एकमेव पारंपारिक ढोल ताशा पथक आहे. दरवर्षी साधारण 25 ते 30 वादन करणारं हे पथक, आपल्या सादरीकरणातून नेहमीच महाराष्ट्राची कला व संस्कृतीचे उत्तम प्रदर्शन आंतरराष्ट्रीय पातळीवर जगासमोर मांडत आले आहे.
यंदाच्या महाराष्ट्र दिनानिमित्त या पथकाच्या संस्थापक सागर पाटील यांनी एक आगळी वेगळी संकल्पना आखली. महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी त्यांनी चक्क एक लक्झरी योटवर, पर्शियन गल्फ या समुद्रात, जगातील एकमेव 7 स्टार हॉटेल ‘बुर्ज अल अरब’ याच्यासमोर, पाण्यात ढोल ताशाचे वादन करायचे ठरवले. ही धाडसी कल्पना आखताना सागर पाटील म्हणतात, महाराष्ट्राची कला व संस्कृती परदेशात राहुन जपण्याचे व त्याचा प्रचार करण्याचे काम आम्ही गेली पाच वर्ष करतच आहोत पण यावर्षी काहीतरी वेगळे करण्याच्या हेतूने ही संकल्पना आखली. आजवर कधीही, कोणीही असे वादन केलेले नाही,आणि हेच औचित्य साधून आम्ही आज हा रेकॉर्ड बनवला आहे.
या वादनासाठी पथकातील 20 वादकांनी सहभाग घेतला व यात महिलांचाही समावेश होता. ही योट दुबई मरीना येथून वादकांना घेऊन निघाली आणि वाटेत Dubai Eye Giant Wheel समोरून वादन करीत बुर्ज अल अरब या हॉटेलच्या समोर पाण्यात थांबली व या ठिकाणी ढोल ताशाचे वादन करून या पथकाने परतीचा प्रवास गाठला.
असा हा विक्रम करून दुबईच नव्हे तर जगभरातील सर्व महाराष्ट्रीय जनतेला त्रिविक्रम ढोल तशा पथकाने महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्या दिल्या.
साल 2021 डिसेंबर मध्ये त्रिविक्रम ढोल तशा पथकाचे संस्थापक सागर पाटील ह्यांना महाराष्ट्र शासनाकडून “मराठी भाषा सम्मान” देण्यात आला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.