मुंबई, 18 एप्रिल : नवी मुंबई येथे आयोजित ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या मंगळवारी 14 झाली. सात रुग्ण अजूनही रुग्णालयात दाखल आहेत. स्थानिक संस्थेच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. मृतांमध्ये दहा महिला आणि चार पुरुषांचा समावेश असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त विठ्ठल डाके म्हणाले, “आज विरारमधील एका 34 वर्षीय महिलेला वाशी येथील एमजीएम रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले, त्यानंतर मृतांची संख्या 14 झाली आहे.” स्वाती वैद्य असे या महिलेचे नाव आहे.
रुग्णालयात दाखल रुग्ण धोक्याबाहेर
तुमच्या शहरातून (मुंबई)
अधिकाऱ्यांनी सांगितले की, रुग्णालयात उपचार घेत असलेल्यांची संख्या सात आहे, आदल्या दिवशी ही संख्या नऊ असल्याचे सांगितले जात होते. डाके म्हणाले, “आता नवी मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये केवळ सात रुग्ण दाखल आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून ते धोक्याबाहेर आहेत.” दरम्यान, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंगळवारी नवी मुंबई येथे आयोजित राज्य पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने लोक मृत्यूमुखी पडल्याने राज्य सरकारचा निषेध केला.
रविवारी कार्यक्रमादरम्यान उष्माघातामुळे 13 जणांचा मृत्यू
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात पवार यांनी ही शोकांतिका नैसर्गिक नसून मानवनिर्मित आपत्ती असून त्याला राज्य सरकार जबाबदार असल्याचे म्हटले आहे. रविवारी खारघर परिसरातील एका मोकळ्या मैदानात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रखरखत्या उन्हात आयोजित कार्यक्रमात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते, त्यापैकी बहुतांश महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे अनुयायी होते. रविवारी झालेल्या कार्यक्रमात उष्माघातामुळे 13 जणांचा मृत्यू झाला.
वाचा – राष्ट्रवादीमधलं पेल्यातलं वादळ! अजितदादांनी एकाच दगडात मारले ‘दोन’ पक्षी!
..म्हणून कार्यक्रम दुपारी घेतला : उदय सामंत
या दुर्दैवी घटनेनंतर अनेकांनी दुपारी कार्यक्रम घेण्यावरुन टीका केली आहे. यावर उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. काल महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडला. आप्पासाहेब यांना हा पुरस्कार दिला. परंतु, दुर्दैवाने उष्माघातामुळे काही जणांचा मृत्यू झाला. परंतु, विरोधक दुर्दैवाने टीका टिपणी करत आहेत. हा कार्यक्रम संध्याकाळी घ्यायचा होता. मात्र, सर्वांना कार्यक्रम संपवून प्रत्येकाला घरी परतात आले पाहिजे म्हणून मुख्यमंत्री यांनी हा कार्यक्रम दुपारी ठेवला, असे स्पष्टीकरण सामंत यांनी दिले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.