पंढरपूर, 17 एप्रिल : अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा रविवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला, यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील उपस्थित होते. नवी मुंबईच्या मैदानामध्ये या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या पुरस्कार सोहळ्याला गालबोट लागलं. या कार्यक्रमात आलेल्या 11 जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे, तर काही जणांवर उपचार सुरू आहेत.
मृतांच्या नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर
तुमच्या शहरातून (सोलापूर)
दरम्यान उष्मघातामुळे ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. असाच एक व्हिडीओ पंढरपूरमधून समोर आला आहे. आपल्या मुलीचं पार्थिव पाहून तिच्या आईने हंबरडा फोडला. मातेचा हा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा आहे. मंगळवेढा गावच्या रहिवासी सविता संजय पवार या देखील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होत्या. मात्र त्यांना या कार्यक्रमावेळी उष्माघात झाला. यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सविता यांचा मृतदेह त्यांच्या मूळ गावी मंगळवेढा येथे आणण्यात आला. सविता यांचा मृतदेह पाहाताच नातेवाईकांनी टाहो फोडला. त्यांच्या आईचा आक्रोश हा काळीज पिळवटून टाकणारा होता.
मृतांच्या कुटुंबीयांना मदत
महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात लाखो श्री सदस्यांनी गर्दी केली होती. मात्र त्यानंतर अचानक काही जणांना उष्माघाताच त्रास जाणवू लागला. या घटनेत आतापर्यंत आकरा जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांनी या रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. तसेच ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.