दिल्ली, 17 एप्रिल : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या श्री सेवकांच्या मृत्यूमुळे राज्यातलं वातावरण तापलं आहे. कडक उन्हामुळे उष्माघाताचा त्रास होऊन 11 श्री सेवकांचा मृत्यू झाला आहे. तर काहींवर उपचार सुरू आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते रविवारी डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. या कार्यक्रमासाठी लाखोंच्या संख्येने श्री सेवक राज्यभरातून खारघर इथं उपस्थित होते. उष्माघातामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांप्रती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत.
अमित शहा यांनी ट्विटरवर म्हटलं की, काल झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला उपस्थित असताना उष्माघाताने प्राण गमावलेल्या श्रीसदस्यांच्या जाण्याने, माझे मन जड झाले आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जे लोक उपचार घेत आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो.
कुठेच बुद्धी वापरली नाही, उष्माघात मृत्यू प्रकरणावरून जितेंद्र आव्हाड सरकारवर संतापले
अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यासाठी आय़ोजित केलेल्या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर श्री सेवक उपस्थित ऱाहिले होते. भरदुपारी कार्यक्रमाचे आयोजन केल्यानं यावेळी उष्माघाताचा त्रास होऊन ११ श्री सेवकांना प्राण गमवावे लागले आहेत. कार्यक्रमाची वेळ भरदुपारी कशी ठेवली यावरून आता विरोधक प्रश्न उपस्थित करत आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दुपारी कार्यक्रम आयोजित करणं हे चुकीचं होतं असं म्हटलंय. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आता याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न विचारला आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याचं गालबोट टाळता आलं नसतं का? राज ठाकरेंचा सवाल
दरम्यान, काल कार्यक्रमावेळी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भर उन्हातही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या श्री सेवकांचे कौतुक केले होते. तसंच अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे कार्य, त्याग, त्यांच्यावर असलेला विश्वास आणि प्रेम यामुळेच इतक्या कडक उन्हातही मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत असं अमित शहा म्हणाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.