मुंबई, 17 एप्रिल : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. आज आणखी एका श्री सदस्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा हा 12 वर पोहोचला आहे. तर अजूनही नवी मुंबईत अनेक सदस्यांची प्रकृती गंभीर आहे, त्यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू आहे, अशी माहिती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिली.
नवी मुंबईतील खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात उष्माघातामुळे 12 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आज नवी मुंबईतील पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कल्याण येथील एका सेवकाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. रविवारी झालेल्या या कार्यक्रमात शेकडो सदस्यांना उष्मघाताचा फटका बसला. अनेक जणांवर अजूनही रुग्णलयात उपचार सुरू आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
दरम्यान, श्री सदस्यांच्या मृत्यूवरून राजकीय वातावरण तापले आहे. कार्यक्रमाची वेळ भरदुपारी कशी ठेवली यावरून आता विरोधक प्रश्न उपस्थित करत आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दुपारी कार्यक्रम आयोजित करणं हे चुकीचं होतं असं म्हटलंय. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आता याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न विचारला आहे.
(महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्माघाताने 12 जणांच्या मृत्यूमुळे अमित शहा गहिवरले, म्हणाले…)
तर उष्माघातामुळे 12 श्री सदस्यांचा मृत्यू झाला होता. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली. तसंच उष्माघातामुळं उपचार घेत असलेल्या रुग्णांची कामोठे येथील रुग्णालयात जाऊन श्री सेवकांच्या तब्येतीची विचारपूस देखील केली. प्रशासनानं योग्य नियोजन केलं असतं तर श्री सदस्यांचे मृत्यू टळले असते असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं. हा कार्यक्रम भर उन्हात न घेता संध्याकाळी करता आला असता हे प्रशासनाला का कळलं नाही का? असा सवालही त्यांनी केला.
तर, सरकारनं कार्यक्रमाच्या आयोजनात अक्षम्य बेपर्वाई दाखवली, श्री सदस्यांपेक्षा राजकीय नेत्यांची सुविधा जास्त पाहिली गेली असा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय. श्री सेवकांसाठी प्रसासनाकडून योग्य तयारी ठेवण्यात आली नव्हती तसंच हा कार्यक्रम संध्याकाळी ठेवला पाहिजे होता, या कार्यक्रमाचं नियोजन योग्य झालं नाही अशा शब्दांत राऊतांनी खरडपट्टी काढली.
श्री सदस्यांच्या मृत्यूमुळे श्री परिवारावर शोककळा पसरली आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या घराबाहेर असलेली फुलांची आरास काढण्यात आली असून घरासमोरील रांगोळी ही पुसली आहे. समाज माध्यमांवर येणाऱ्या प्रतिक्रियांमुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या घराबाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.