मुंबई, 11 एप्रिल : महाविकासआघाडीमधल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बैठक झाली आहे. उद्धव ठाकरे हे सिल्व्हर ओकवर पवारांची भेट घेण्यासाठी गेले होते, यावेळी त्यांच्यासोबत संजय राऊतही होते. तर सिल्व्हर ओकवर शरद पवारांसोबत सुप्रिया सुळे होत्या. मागच्या काही दिवसांपासून महाविकासआघाडीमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून वाद सुरू आहेत, त्यामुळे ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना मित्रपक्षांना विचारात घेतलं नाही, असं वक्तव्य शरद पवार यांनी आजच केलं होतं. याशिवायही काही मुद्द्यांवरून महाविकासआघाडीमध्ये मतभेद आहेत.
तुमच्या शहरातून (मुंबई)
महाविकासआघाडीमध्ये कशावरून मतभेद?
अदानी प्रकरणामध्ये जेपीसीची गरज नसल्याचं विधान शरद पवार यांनी केलं, पण काँग्रेस आणि शिवसेनेनं जेपीसीची मागणी लाऊन धरली आहे. तसंच सावरकरांच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आहेत. राहुल गांधी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शरद पवारांनी राहुल गांधींसमोरच विरोधकांच्या बैठकीत नाराजी व्यक्त केली. तसंच उद्धव ठाकरेंनीही या मुद्द्यावरून काँग्रेसला इशारा दिला होता.
ईव्हीएमच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसने टीका केली, पण अजित पवारांनी मात्र ईव्हीएमला दोष देऊ नका, अशी भूमिका मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीवरून सुरू असलेल्या वादातही राष्ट्रवादीची भूमिका वेगळी राहिली. 2014 साली नागरिकांनी मोदींना त्यांची डिग्री पाहून मतं दिली नाहीत, असं अजित पवार म्हणाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.