भाजपच्या महाजनआक्रोश मोर्चाची सुरूवात आज गडचिरोलीपासून झाली. यात, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकस आघाडीवर अनेक आरोप केले आहेत. कृषीपंपाला 24 तास वीज, वीजतोडणी बंद करणे, कर्जमाफी आणि अनुदानाची रक्कम त्वरित देण्यात यावी, अवकाळी, अतिवृष्टी, वादळ, किडीची मदत तत्काळ देण्यात यावी, नवाब मलिक यांचा राजीनामा तत्काळ घ्यावा अशा विविध 16 मागण्यांसाठी हा मोर्चा आहे. या महाविकास सरकारमध्ये भ्रष्टाचाराची ट्वेंटि-ट्वेंटी सुरू आहे. मुंबईतील बिल्डरांचा कर थकला आहे, हिंमत असेल तर तो वसूल करा. त्यांच्याकडून मालपाणी मिळते, म्हणून तेथे ढिल आणि आमच्या शेतकर्यांकडून जुलमी वसुली सुरू, अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. नक्की काय म्हणालेत देवेंद्र फडणवीस जाणून घेऊया
नक्की काय म्हणालेत देवेंद्र फडणवीस ?
- बारमालकांची फी 50 टक्के कमी केली. पण, गडचिरोली, नंदूरबारमध्ये शेतकर्यांचे वीजबिल 50 टक्के कमी करावं असं त्यांना वाटले नाही. विदेशी दारुवर कर अर्धा केला. पण, शेतकर्यांना कोणतीही मदत केली नाही. या सरकारला गरिबांची नाही, तर बेवड्यांची चिंता अधिक आहे, अशी टीका त्यांनी केली.
- राज्यातील महाविकास आघाडीवर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडीने कोरोनाकाळात दारु सोडून कुणालाच मदत नाही. या सरकारने विदेशी दारुवरचा कर कमी केला पण शेतकऱ्यांचं वीज बील माफ केलं नाही. धान उत्पादकांना 100 ते 150 कोटी रुपयांचा बोनस हे सरकार देऊ शकलं नाही.
- कोरोना काळात यशवंत जाधव यांनी 400 कोटींची संपत्ती कमावली. त्यांना भ्रष्टाचारातील फक्त 10 टक्के मिळाले, बाकी 90 टक्के कुठे गेले? असाही सवाल देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.
- गरिबांच्या तोंडचा घास काढून घेणारे सरकार जनतेला काय न्याय देणार? असा सवाल विचारत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मोदी सरकारने मोठ्या प्रमाणात धान्य राज्य सरकारला दिलं होतं. पण मोदींचे नाव होईल म्हणून या सरकारने ते धान्य गोदामात सडवलं पण गरिबांपर्यंत पोहोचवलं नाही. ठाकरे सरकार गरिबांचा विचार करणार नसेल तर मोदी सरकार ही भूमिका बजावेल.
- देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार आमच्या पाठीत खंजीर खुपसून सत्तेत आले, ते आता लोकांनाही धोका देत आहे. सामान्यांना धोका देणाऱ्या सरकारला वठणीवर आणणार. 2024 साली राज्यात भाजप एकहाती सत्ता प्राप्त करणार.
- मतांसाठी ओबीसींचा वापर करतात. ओबीसींसाठी पहिला संवैधानिक आयोग पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी तयार केला. मात्र, महाविकास सरकारने ओबीसींचे आरक्षण घालविले. ओबीसींचे आरक्षण संपविण्याचे षडयंत्र होते आहे. भाजपाचा कार्यकर्ता जिवंत आहे, तोवर हे आरक्षण संपू देणार नाही. अखेरच्या क्षणापर्यंत भाजपा ओबीसी आरक्षणासाठी संघर्ष करीत राहील, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या आधी कोरोनाकाळात भ्रष्टाचार झाल्याचं सांगून सरकारला घेरलं होतं. आता त्यांनी कोरोना काळातील आणखी एका भ्रष्टाचारावरून सरकारला घेरलं आहे. कोरोना काळात वेश्यांना देण्यात येणारे पैसे या लोकांनी आपल्या नातेवाईंकाना दिले आहेत. वेश्यांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांना काय म्हणतात हे सर्वांना माहीत आहे. संजय राऊत तो शब्द नेहमी वापरत असतात. असे काही लोक या सरकारमध्ये आहेत, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे, महाविकास आघाडी याला काय उत्तर देणार , यावरून महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा नवीन वाद उदयास येणार का अशा अनेक प्रश्नांना सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात उधाण आलं आहे.