कोल्हापूर, 27 एप्रिल : सुरुवातीपासून वादात असलेल्या दिपाली भोसले चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आयोजित महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा शेवट देखील वादानेच झाला. कोल्हापुरात खेळवण्यात आलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अहमदनगरच्या भाग्यश्री फंडचा विजय झाला. परंतु या निकालानंतर स्पर्धेच्या ठिकाणी मोठा गोंधळ पाहायला मिळाला. यासोबतच ही स्पर्धा मॅनेज झाली असल्याचा आरोप पराभूत झालेल्या पैलवानाच्या कोच आणि पालकांनी केला.
सुरुवातीपासूनच कोल्हापूर येथे भारतीय कुस्ती महासंघाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेवर नेमलेल्या अस्थाई समितीच्या परवानगीने आणि दीपाली भोसले चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित केली गेलेली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही अनधिकृत असल्याबाबत वाद सुरु होता. याबाबत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने देखील पत्रक काढून काही दिवसांपूर्वी सांगली येथे पारपडलेली स्पर्धाच खरी महिला महाराष्ट्र केसरी असल्याचे म्हंटले होते. तसेच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने पत्रक काढून आपल्याशी संलग्न असलेल्या जिल्हा आणि शहर तालीम संघानी या स्पर्धेत सहभागी होऊ नये असा इशारा दिला होता. वादाची किनार असलेली ही स्पर्धा अखेर कोल्हापूरातील ऐतिहासिक खासबाग मैदानावर 27 एप्रिल रोजी खेळवण्यात आली.
कोल्हापुरातील महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना अहमदनगरची पैलवान भाग्यश्री फ़ंड आणि कोल्हापूरची अमृता पुजारी यांच्यात खेळवण्यात आला. यात भाग्यश्री फ़ंडने अमृताचा पराभव करत मनाच्या गदेवर आपले नाव कोरले. भाग्यश्री फ़ंडने विजय मिळवला खरा परंतु यानंतर स्पर्धेच्या ठिकाणी पराभूत झालेल्या अमृता पुजारीच्या कोच आणि पालकांची आयोजकांशी वादावादी झाली.
काय आहे प्रकरण?
अहमदनगरची भाग्यश्री फंड आणि कोल्हापूरची अमृता पुजारी यांच्यात झालेल्या लढतीत भाग्यश्रीचा विजय झाला. मात्र यानंतर ही संपूर्ण स्पर्धा मॅनेज असल्याचा आरोप अमृता पुजारीचे कोच आणि तिच्या पालकांनी केला. सुरुवातीला वजनी गटातून देखील भाग्यश्रीकडून नियमानुसार एकच कपडा घालून वजन करणे अपेक्षित असताना भाग्यश्रीने अंगावर चार जोड कपडे घातले होते. तसेच 64 किलो वजन असताना या कपड्यांमुळे तिचे 68 किलो वजन झाले. तरीही आयोजकांकडून आम्ही वजन असंच करतो असे सांगितल गेलं आणि महिला पंचाची मागणी केलेली असताना सुद्धा आयोजकांकडून मॅनेज झालेले कोच ठेवण्यात आले असा आरोप अमृताच्या वडिलांनी केला आहे. तसेच आमच्या मुलींवर अन्याय झाल असल्याच देखील त्यांनी म्हंटल आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.