सूरत 29 एप्रिल : आई आपल्या मुलांना जीवापाड जपते. मात्र काहीवेळा अशा घटनाही समोर येतात, ज्या आईच्या नात्यालाच नाही तर माणुसकीलाही काळिमा फासणाऱ्या असतात. असंच एक हैराण करणारं प्रकरण आता गुजरातच्या सूरतमधून समोर आलं आहे. एका महिलेने आपल्या 5 वर्षांच्या फुलासारख्या निष्पाप मुलीला बेदम मारहाण करून ठार केलं. पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून आईच्या क्रूरतेचा खुलासा झाला, त्यानंतर आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे.
ही घटना सुरतमधील चौक बाजार पोलीस स्टेशन परिसरातील आहे. यात एक महिला जखमी अवस्थेतील आपल्या मुलीला घेऊन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती. महिलेनं डॉक्टरांना सांगितलं की, तिच्या मुलीला अपस्मार झाला होता आणि ती पडली होती. यामुळे तिला दुखापत झाली.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर मुलीचा मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनाच्या वतीने चौक बाजार पोलीस ठाण्याच्या पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांचं पथक रुग्णालयात पोहोचलं. या मुलीच्या शरीरावर जखमेच्या खुणा होत्या. यावरून पोलिसांना संशय आला. त्याआधारे पोलीस आणि रुग्णालयाच्या डॉक्टर पॅनलने शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला.
प्ले ग्रुपमध्ये चिमुकल्यांना उचलून फेकलं, आता दोन्ही शिक्षिकांना जेलमध्ये टाकलं
पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये खुलासा झाला की, मुलीच्या शरीरावर झालेली जखम सामान्य चक्कर येऊन पडल्यामुळे झाली नाही. यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी खुनाची शक्यता व्यक्त केली. हत्येच्या संशयावरून पोलिसांनी मयत मुलीच्या नातेवाईकांची स्वतंत्रपणे चौकशी सुरू केली असता, आईनेच खुनाचा खुलासा केला.
आरोपी महिलेनं सांगितलं की, मुलगी शारीरिकदृष्ट्या अपंग होती आणि तिला खूप त्रास देत असे. याला कंटाळून तिने स्वतःच रागाच्या भरात तिला जमिनीवर आपटले, त्यात मुलगी जखमी झाली. रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आईला अटक करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.