एखाद्या व्यक्तीची ओळख त्यांच्या निर्णयावरून व विचारावरून निर्माण होत असते. अमर्त्य सेन यांच्या बाबतीत ती ओळख जागतिक पातळीवर होत आहे. लोकांना मतदानाचा निव्वळ हक्क देऊन उपयोग नाही, त्यांना तो बजावण्याचे योग्य व चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. आर्थिक विकासाचा विचार करताना त्यांनी आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास यांतील सूक्ष्म फरक स्पष्ट केला आहे. सेन हे राजकीय स्वातंत्र्याचे कट्टर समर्थक ठरतात. त्यांची अशी धारणा आहे की, आर्थिक वृद्धी प्राप्त करून घेण्यासाठी आर्थिक सुधारणांपूर्वी शिक्षण, सार्वजनिक आरोग्य यांसारख्या क्षेत्रांत मूलभूत सुधारणा घडवून आणल्या पाहिजेत. अमर्त्य सेन जागतिक कीर्तीचे मानवतावादी बुद्धिप्रामाण्यवादी भारतीय अर्थशास्त्रज्ञ, भारतरत्न आणि अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराचे मानकरी. कल्याणकारी अर्थशास्त्र, सामाजिक निवडीचा सिद्धांत, तसेच दारिद्र्याच्या प्रश्नावर केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना १९९८ मध्ये अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार देण्यात आला.
सेन यांचा जन्म शांतीनिकेतन येथे एका सुशिक्षित आणि सुसंस्कृत कुटुंबात आशुतोष व अमिता या दांपत्यापोटी झाला. त्यांचे आजोबा क्षितिमोहन हे विश्वभारतीत संस्कृत व भारतीय संस्कृती हे विषय शिकवीत. वडील आशुतोष हे डाक्का विद्यापीठात रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. सेन यांनी डाक्का येथील सेंट ग्रेगरी स्कूलमध्ये सुरुवातीचे शिक्षण घेऊन पुढे विश्वभारतीत इंटरपर्यंतचे शिक्षण घेतले आणि नंतर कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून अर्थशास्त्र हा विषय घेऊन ते बी. ए. झाले. नंतर ते पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. त्यांनी दुसऱ्यांदा अर्थशास्त्र विषयात बी. ए. ही पदवी मिळविली. त्यानंतर त्यांनी तेथूनच एम. ए. आणि त्याच वर्षी पीएच. डी. या पदव्या संपादित केल्या. अर्थशास्त्राबरोबरच त्यांनी तत्त्वज्ञान विषयाचा अभ्यास केला. अमेरिकेतील हार्व्हर्ड विद्यापीठात अर्थशास्त्र आणि तत्त्वज्ञान या विषयांचे अध्यापन केले. त्यांची ‘मास्टर ऑफ ट्रिनिटी कॉलेज’ या पदावर नियुक्ती झाली. या पदावर काम करणारे ते पहिले भारतीय होत. त्यानंतर हार्व्हर्ड येथे लॅमाँट युनिव्हर्सिटीत प्रोफेसर म्हणून त्यांनी काम केले. अर्थशास्त्रीय धोरणांचे समाजाच्या हितावर काय परिणाम होतात, त्या धोरणांचे मूल्यमापन करणे हे कल्याणकारी अर्थशास्त्राचे उद्दिष्ट होय. त्यांनी लिहिलेल्या आपल्या कलेक्टिव्ह चॉइस अँड सोशल वेल्फेअर या ग्रंथात व्यक्तींचे हक्क, बहुसंख्याकांचे शासन आणि व्यक्तीच्या स्थितिगतीबाबतच्या माहितीची उपलब्धता यांसारख्या प्रश्नांचा परामर्श घेतला आहे. यांतून संशोधकांना अशा प्रश्नांचा अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली. सेन यांनी समाजातील दारिद्र्याचे व कल्याणाचे निर्देशांक निश्चित केले. देशातल्या वेगवेगळ्या समाजगटांत दारिद्र्याचे प्रमाण किती आहे; त्याचे विभाजन कसे आहे; त्यांत वेळोवेळी कसे आणि कोणते बदल झाले आहेत, याचा अभ्यास करण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. तसेच देशातले दारिद्र्याचे प्रमाण आणि आर्थिक कल्याणाचे प्रमाण ह्यांच्या तुलनेसाठीही हे निर्देशांक महत्त्वाचे ठरतात. त्यांनी देशांची क्रमवारी ठरविण्यासाठी लोकांचे आयुर्मान, शिक्षण व उत्पन्न यांवर आधारित ‘युनायटेड नेशन्स ह्यूमन इंडेक्स’ ही प्रणाली विकसित केली. दुष्काळ हा केवळ अन्नधान्याच्या तुटवड्यामुळेच होत नसून अन्नवाटपाच्या यंत्रणांमधील विषमतेमुळेही तो होऊ शकतो, असे प्रतिपादन त्यांनी आपल्या ग्रंथात केले. शहरांमधून निर्माण झालेली आर्थिक तेजी आणि त्यामुळे वाढलेल्या अन्नधान्याच्या किमती यांमुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होणे शक्य असते. वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी दुष्काळ प्रत्यक्ष पाहिला होता. त्यात उपासमारीने लाखो लोक मरण पावले होते. वाढलेल्या किमतीत धान्य घेणे ज्यांना शक्य नव्हते, अशी माणसे मृत्युमुखी पडली. माहितीच्या आधारे सेन यांनी असे दाखवून दिले होते की, बंगालमध्ये त्या वेळी धान्यसाठा पुरेसा होता; तथापि साठेबाजीमुळे धान्य महाग झाले. परिणामतः सामान्य लोकांना ते खरेदी करणे अशक्यप्राय झाले. त्यामुळे लोकांची उपासमार झाली. विकासाच्या संदर्भात सेन यांनी क्षमतेची संकल्पना विकसित केली. लोकांच्या क्षमता वाढायच्या असतील, तर त्यांचे हक्क अबाधित राहिले पाहिजे आणि ते बजाविण्याचे स्वातंत्र्य व योग्य त्या सोयीसुविधा त्यांना दिल्या गेल्या पाहिजे, याबाबत ते आग्रही राहीले. सेन यांना नॅशनल ह्यूमॅनिटी मेडल देऊन सन्मानित करण्यात. हा पुरस्कार पहिल्यांदाच बिगर अमेरिकन तज्ज्ञाला दिला गेला. त्याच जर्मनीकडून दरवर्षी देण्यात येणाऱ्या ‘जर्मन बुक ट्रेड’च्या शांती पुरस्काराचे सेन मानकरी ठरले. वैश्विक न्याय, शिक्षण आणि आरोग्य सेवा यांमध्ये सामाजिक असमानता नसावी, या मुद्द्यांवर त्यांनी केलेल्या असामान्य कार्यासाठी ते मानकरी ठरले. सन्मानचिन्ह व सुमारे एकवीस लाख रुपये या स्वरूपात तो पुरस्कार दिला जातो. सध्या सेन हे चीनमधील बीजिंग विद्यापीठातील ‘सेंटर फॉर ह्यूमन अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट स्टडीज’चे संचालक आहेत. तसेच पंतप्रधानांच्या ‘ग्लोबल अॅडव्हायजरी काउन्सिल ऑफ ओव्हरसीज इंडियन्स’चे ते सदस्य आहेत. अशा या महान व्यक्तीला आजच्याच दिवशी भारतरत्न देण्यात आला, याचा अभिमान वाटतो.