नवी दिल्ली, 15 मे : मंदिर, पूजाअर्चा, पुजारी यावर चर्चा सुरू झाली की अगदी सहजपणे आपल्या डोळ्यांसमोर सोवळ्याओवळ्यातील एखादा पुरुष येतो. मंदिरातील पुजारी म्हणून नेहमी आपण एखाद्या पुरुषालाच पाहिलेलं असतं. मात्र पुजारी म्हणून एखादी महिला बघितल्याचं तुम्हाला आठवतं का? या प्रश्नाला नाही असंच अनेकांचं उत्तर असेल. मात्र, केरळ राज्यात सध्या एका मुलीची व तिच्या आईची खूपच चर्चा आहे. या दोघी मायलेकींनी पौरोहित्याचं योग्य प्रशिक्षण घेतलेलं असून त्या दोघीही महिला पुजारी म्हणून प्रसिद्ध आहेत.
केरळमधील पौरोहित्य आणि धार्मिक कर्मकांडातील पुरुषी वर्चस्व मोडून काढत एका मायलेकीची जोडीनं इतिहास रचलाय. 24 वर्षीय ज्योत्स्ना पद्मनाभन व तिची आई अर्चना कुमारी या दोघींनी पौरोहित्याचे धडे घेऊन आता मंदिरात पुजारी म्हणून काम सुरू केलं आहे. ज्योत्स्ना हिची वडिलोपार्जित मंदिरात पूजा करण्याची इच्छा होती. तिची ही इच्छा तर पूर्ण झालीच, या शिवाय आता ती व तिची आई अर्चना त्रिशूर जिल्ह्यातील एका मंदिरात पुजाऱ्याची भूमिका पार पाडत आहेत. तसंच अनेकदा आजुबाजुच्या मंदिरांत तसंच इतर ठिकाणी धार्मिक विधीसुद्धा करत आहेत. मासिक पाळीच्या काळात या दोन्ही स्त्रिया पुरोहित कर्तव्यापासून दूर राहतात.
वयाच्या सातव्या वर्षी घेतली दीक्षा
ज्योत्स्ना पद्मनाभन हिने वयाच्या सातव्या वर्षी एका ज्येष्ठ ब्राह्मण पुरोहिताकडून मंत्र, धार्मिक विधी करण्याची दीक्षा घेतली. ज्योत्स्ना यांनी भद्रकाली देवीची प्रतिष्ठापना पेनकन्न्यकावू श्रीकृष्ण मंदिरात केली, हे तिच्या कुटुंबाचं वडिलोपार्जित मंदिर आहे, याच मंदिरात तिचे वडील मुख्य पुजारी आहेत. तीसुद्धा या मंदिरात अनेकदा देवाची पूजा करते, शिवाय शक्य तेव्हा मंदिरातील दैनंदिन सर्व धार्मिक विधी करते. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून ती हे काम करीत असून आता तिची चर्चा संपूर्ण पंचक्रोशीत आहे.
वय फक्त 16 पण IAS अधिकाऱ्यांना सुद्धा शिकवते, जान्हवीबद्दल वाचून तुम्ही व्हाल फॅन!
याबाबत ज्योत्स्ना म्हणाली, ‘माझे वडिल जेव्हा मला मंदिरात पूजा करण्यास सांगतात, तेव्हा मी करते. कधी कधी एखादा धार्मिक विधी करण्यासाठी ते जाऊ शकत नाही, तेव्हा ते मला जाऊन संबंधित धार्मिक विधी करण्यास सांगतात, व तो मी करून येते.’
पुरुषप्रधान ब्राह्मण समाजाचा पुरोहितपदामध्ये महिलांच्या प्रवेशाला काही आक्षेप आहे का, असं विचारलं असता ज्योत्स्ना म्हणाल्या की, ‘पारंपरिक समाजातील कुटुंबांमध्ये स्त्रिया “थेवरम”, “नेद्यम” आणि अशा प्रकारचे इतर विधी करत असत. मंदिरात पूजा करणं ही नवीन गोष्ट असू शकते. पण पारंपरिक कुटुंबात स्त्रिया जसे इतर विधी करत असत, तसे आम्ही करत आहोत,त्यात कोणालाच फरक जाणवला नाही,’ ती पुढे म्हणाली, ‘मी एक स्त्री आहे, म्हणून स्त्री-पुरुष समानता सारख्या गोष्टी सिद्ध करण्याच्या हेतूनं पूजा आणि पौरोहित्य करण्याच्या क्षेत्रात प्रवेश केलेला नाही. मी माझ्या तीव्र भक्ती आणि उत्कटतेमुळे आले आहे. हे स्त्री-पुरुष समानता सिद्ध करण्याचे क्षेत्र नाही.’
मुलीपाठोपाठ आईने घेतले पौरोहित्याचे धडे
जेव्हा ज्योत्स्ना पूजा आणि धार्मिक विधी करण्याचे धडे घेऊ लागली, तेव्हा तिची आई अर्चना कुमारी हीदेखील तिचं अनुकरण करायला लागली. याबाबत पीटीआयशी बोलताना अर्चना कुमारी म्हणाल्या, ‘ज्योत्स्ना घरी पौरोहित्य, धार्मिक विधी, पूजाअर्चा याबाबत सविस्तर चर्चा करायची. ती जे मंत्र म्हणत होती, मंत्र म्हणताना त्याचे उच्चार व हावभाव करीत होती, ते पाहून मीदेखील नकळत या गोष्टी आत्मसात केल्या. हे शिकण्याची माझ्या मनात तीव्र इच्छा निर्माण झाली. माझ्या पतीनेसुद्धा मला धार्मिक विधी आणि पूजापाठ शिकण्याच्या माझ्या निर्णयाला पाठिंबा दिला. तसंच माझे पती अनेक वर्षांपासून पूजा करीत असलेल्या मंदिरात मला पूजा करण्याची संधी दिली गेली. गेल्या काही वर्षांपासून, मी संबंधित मंदिर व्यवस्थापनाच्या विनंतीनुसार तेथे दैनंदिन पूजा विधी विधी करत आहे, तसेच इतर मंदिरांमध्ये सुद्धा मूर्तीची प्रतिष्ठापना किंवा इतर धार्मिक विधी करीत आहे.’
गृहिणी आणि पुजारी यांच्या कर्तव्यात समतोल राखण्यासाठी वेळेचं व्यवस्थापन करणे कठीण असले तरी याबाबत अर्चना कुमारी यांनी सांगितलं की, ‘मी माझ्या दोन्ही जबाबदाऱ्या पूर्ण करू शकते, याचा मला आनंद असून मी समाधानी आहे.’
भक्तीच्या भावनेतून पूजापाठ
ज्योत्सा व अर्चना कुमारी या त्यांच्या पौरोहित्याला लैंगिक समानतेचा उपक्रम किंवा समाजात अस्तित्वात असलेल्या लैंगिक रूढींना तोडण्याचा प्रयत्न म्हणून संबोधू इच्छित नाही. त्यांच्या मते, शुद्ध भक्तीतून आणि समाजात कोणताही मुद्दा सिद्ध न करण्यासाठी त्यांनी हे क्षेत्र निवडलं आहे.
ज्योत्स्ना हिने अनुक्रमे कांची आणि मद्रास विद्यापीठातून वेदांत आणि साहित्य (संस्कृत) मध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. वयाच्या सातव्या वर्षांपासून तिने पौरोहित्य शिकण्यास सुरुवात केली होती. तेव्हाच तिने पुजारी होण्याचं स्वप्न पाहिलं होतं.
‘माझे वडील पद्मनाभन नंबूथिरीपाद यांना पूजा आणि धार्मिक विधी करताना पाहून मी मोठी झाली आहे. त्यामुळे लहानपणापासूनच हे शिकण्याचे स्वप्न माझ्या मनात रुजले आहे. जेव्हा मी माझ्या वडिलांकडे माझी इच्छा व्यक्त केली, तेव्हा त्यांनी विरोध केला नाही. त्यांना ती खरी वाटली म्हणून त्यांनी सर्व सहकार्य केलं,’ असं ज्योत्स्ना हिने पीटीआयला सांगितले. ‘कोणत्याही प्राचीन ग्रंथांनी किंवा परंपरेने स्त्रियांना धार्मिक विधी करण्यास किंवा मंत्रांचा जप करण्यास मनाई केलेली नाही,’ असंही तिनं स्पष्ट केलं.
दरम्यान, सध्या ज्योत्स्ना व अर्चना कुमारी या मायलेकींची खूपच चर्चा आहे. अनेकजण त्यांना धार्मिक विधी करण्यासाठी आमंत्रित सुद्धा करतात. ही एक चांगल्या बदलाची नांदी म्हणावी लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.