नवी दिल्ली, 30 मे : मणिपूरमध्ये हिंसाचाराची आग दिवसेंदिवस भडकत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळेच आता क्रीडा जगतातील बड्या व्यक्तींनी याप्रकरणी सरकारला अल्टिमेटम देण्यास सुरुवात केली आहे. ऑलिम्पिक पदक विजेत्या मीराबाई चानूसह मणिपूरमधील एकूण 11 क्रीडा व्यक्तिमत्त्वांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले आहे. यासोबतच आपल्या राज्यात लवकरच शांतता प्रस्थापित न केल्यास पुरस्कार परत करू, असा इशाराही देण्यात आला आहे.
मणिपूरमध्ये सध्या आरक्षणाचा वाद पेटला आहे. हे भांडण मेईतेई आणि कुकी जमातींमध्ये आहे. अनुसूचित जमातीत आपला समावेश करण्याची मागणी मेईतेई करत आहे. त्यांच्या मागणीमुळे त्यांनी राष्ट्रीय महामार्गही रोखून धरला आहे. परिणामी राज्यात हिंसाचार उफाळून आला आहे. या पार्श्वभूमीवर आता खेळाडूंनी भूमिका घेतली आहे. केंद्र सरकारला पत्र लिहिणाऱ्या खेळाडूंमध्ये पद्म पुरस्कार विजेती वेटलिफ्टर कुंजराणी देवी, भारतीय महिला फुटबॉल संघाची माजी कर्णधार बीम बीम देवी, बॉक्सर एल सरिता देवी आणि इतरांचा समावेश आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 2 लवकरात लवकर खुला करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
वाचा – ‘द केरळ स्टोरी’नंतर आता ‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ वादात; दिग्दर्शक म्हणाले, ‘माझी हत्या..
केंद्र सरकारपुढे एकूण आठ मागण्या ठेवण्यात आल्या असून त्यापैकी एक मागणी महामार्ग खुला करण्याची आहे. “एनएच-2 अनेक ठिकाणी ब्लॉक करण्यात आला आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे हा महामार्ग लवकर खुला करावा. आम्हाला शांतता हवी आहे, असे वेटलिफ्टर कुंजा देवी यांनी आपल्या भावनिक संदेशात म्हटले आहे. आमच्याकडून सर्व काही घ्या, फक्त शांती द्या. ज्या प्रकारे दिल्ली आणि मुंबईचे लोक जीवन जगत आहेत, त्याप्रमाणे आम्हाला आमचे जीवन शांततेने जगायचे आहे. मला पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगायचे आहे की, आम्हाला शांततेशिवाय काहीही नको आहे.
बॉक्सर एल सरिता देवी म्हणाली, “आम्ही देशाची कीर्ती वाढवली आहे. क्रीडा जगतात मैतई समाजाचे मोठे योगदान आहे. तरीही लोकांच्या नजरेत आमचा आदर नाही, असे वाटते. जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही आमची पदके परत करू.” गृहमंत्री अमित शाह सध्या मणिपूरच्या दौऱ्यावर आहेत. सर्व पक्षांशी बोलून शांतता प्रस्थापित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.