सोलापूर : “माझे वडील हे देशाचे गृहमंत्री, ऊर्जामंत्री राज्याचे मुख्यमंत्री, आंध्रप्रदेशचे राज्यपाल होते, लहानपणापासून मी लालबत्तीच्या गाडीत फिरले आहे आणि सत्ता काय असते हे मी बघितलंय, सत्तेसाठी मी राजकारणात आलेली नाही, मला लोकांची कामे करायची होती. समाजकारण करायचं होतं.” असं म्हणत काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात (Solapur) जनतेशी संवाद साधला.
सोलापुरातील यंत्रमाग धारक संघाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. मला टक्केवारी, कमिशनचं राजकारण अजून ही जमत नाही आणि कधीही जमू नये, पण जर तस मी कधी केलं तर माझे कान धरुन मला खाली बसवा, छडी तुमच्या हातात आहे. मी आमदार असेल माझ्या घरी, इथे मी तुमची नोकर आहे. जर तुम्हाला कधीही असं वाटलं तर तुम्ही मला घरी बसवा. पण जर मी तुमची काम केली, तर पाठीवर थापही द्या, मला तितकचं पुरेसं आहे, अशा भावनाही प्रणिती शिंदेंनी व्यक्त केल्या.
राजकारणात येण्यापुर्वी सोलापूर शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काम करायचे. त्यानंतर मी सोलापूर शहर मध्य मतदारसंघ निवडला, हे माझ्या वडिलांनासुद्धा माहिती नव्हतं. मी त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी मला राजकारणात येण्यास आणि निवडणूक लढवण्यास विरोध केला. पण मला माझ्या समाजकारणातील क्षेत्र वाढवायचं होत. सोलापूर शहर मध्य मतदारसंघात पावात्यांचं राजकारण चालू होत, उद्योगक्षेत्र विस्कळीत झालं होते. हे सर्व बदलण्यासाठी मी राजकारणात आले. असे मतही प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केलं.