अहमदाबाद, 10 एप्रिल : अखेरच्या षटकात पाच षटकार मारून रिंकू सिंहने गुजरात टायटन्सच्या तोंडचा विजयाचा घास हिरावून घेतला. केकेआरच्या संघाला अविश्वसनीय असा विजय मिळवून देणाऱ्या रिंकूने त्याचा प्रत्येक षटकार हा संघर्ष करणाऱ्या कुटुंबाला अर्पण केला. रिंकू सिंह उत्तर प्रदेशातल्या अलीगढमधील एका सामान्य कुटुंबात जन्मला. त्याचे वडील घरांमध्ये गॅस सिलिंडर पोहोचवायचं काम करायचे. कुटुंबाचे कर्ज फेडण्यासाठी रिंकू त्याला उत्तर प्रदेशच्या अंडर 19 संघात खेळाडू म्हणून मिळणारे पैसे वाचवायचा, याशिवाय त्याने घरात नोकराचं कामही केलं.
रिंकू सिंहने 21 चेंडूत सहा षटकार आणि एक चौकार मारत गुजरातकडून विजय हिसकावून घेतला. 25 वर्षांच्या या खेळाडूने गेल्या हंगामातही 15 चेंडूत 40 धावा केल्या होत्या. मात्र लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात अखेरच्या षटकात संघाला विजयासाठी 21 धावा करता आल्या नव्हत्या.
सबकुछ रिंकू! सलग 5 षटकारांसह नोंदवले 5 विक्रम; IPLच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं
अविस्मरणीय खेळी साकारून संघाला विजय मिळवून दिल्यानंतर रिंकू सिंहने म्हटलं की, मला विश्वास होता की मी हे करू शकतो. गेल्या वर्षी लखनऊमध्ये अशीच स्थिती होती. तेव्हाही विश्वास होता. मी जास्त विचार करत नव्हतो फक्त एका पाठोपाठ एक फटके मारत राहिलो.
माझ्या वडिलांनी खूप संघर्ष केलाय. मी एका शेतकरी कुटुंबातून येतो. प्रत्येक चेंडू जो मी मैदानाबाहेर मारला तो त्या लोकांना अर्पण होता ज्यांनी माझ्यासाठी इतका त्याग केला असंही रिंकूने म्हटलं.
केकेआरचा कर्णधार नितीश राणाने म्हटलं की, रिंकूने गेल्या वर्षीही अशी खेळी केली होती पण आम्हाला तो सामना जिंकता आला नव्हता. गुजरातविरुद्ध दुसरा षटकार मारला तेव्हा आम्हाला विजयाचा विश्वास वाटला. कारण यश दयालची कामगिरी चांगली होत नव्हती. सर्व श्रेय रिंकू सिंहला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.