मुंबई, 04 एप्रिल : पश्चिम रेल्वे बुधवार 5 एप्रिलपासून जलद मार्गांसह 11 अतिरिक्त ट्रेन्स चालवणार आहे. नवीन फास्ट गाड्या आणखी फास्ट धावतील, कारण त्या वांद्रे आणि बोरिवली स्थानकावर थांबणार नाहीत, असं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. वांद्रे आणि बोरिवली ही पश्चिम रेल्वे मार्गावरील महत्त्वाची स्थानकं आहेत. इथे प्रत्येक फास्ट व स्लो लोकल ट्रेन थांबते; पण, या नव्या प्रयोगात ही दोन्ही महत्त्वाची स्थानकं वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पश्चिम उपनगरी रेल्वेंतून प्रवास करणाऱ्यांचा वेळ वाचेल, अशी आशा अधिकाऱ्यांना आहे. या संदर्भात ‘मिड-डे’ ने वृत्त दिलंय.
“मुंबई उपनगरीय प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने 5 एप्रिलपासून 11 अतिरिक्त 12-कार नॉन-एसी लोकल ट्रेन सेवा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ट्रेन सर्व्हिसेसची एकूण संख्या 1,383 वरून 1,394 होईल, ” असं पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (PRO) सुमित ठाकूर म्हणाले.
“ज्या फास्ट सर्व्हिसेस सुरू केल्या जात आहेत, त्या प्रायोगिक तत्त्वावर बोरिवली आणि वांद्रे येथे थांबतील. त्यानुसार, सध्याच्या काही ट्रेनच्या वेळेत किरकोळ बदल केले जातील,” असंही ठाकूर पुढे म्हणाले. वेस्टर्न रेल्वेअंतर्गत दररोज 27.24 लाखांहून अधिक प्रवासी लोकल ट्रेनने प्रवास करतात.
तुमच्या शहरातून (मुंबई)
उद्धव ठाकरे पोहोचले ठाण्यात, शिंदे गटाने मारहाण केलेल्या महिलेची हॉस्पिटलमध्ये जाऊन घेतली भेट
सूत्रांनी सांगितले की, ‘स्किप हॉल्ट’ संकल्पनेमुळे गर्दीचे स्वरूप बदलेल आणि फास्ट गाड्यांचा रनिंग टाइम आणखी कमी होईल. ही संकल्पना पुढे सुरू राहील की नाही हे पायलट रन दरम्यान प्रवाशांच्या फीडबॅकवर अवलंबून असेल, असेही ते म्हणाले. या नव्या अॅडिशनसह वेस्टर्न रेल्वे आणि सेंट्रल रेल्वे मिळून मुंबईत 3,204 उपनगरीय ट्रेन चालवतील. सेंट्रल रेल्वेचा मुंबई विभाग मेन लाईन, हार्बर लाईन, ट्रान्स हार्बर कॉरिडॉर आणि चौथा कॉरिडॉर खारकोपर पर्यंत 1,810 ट्रेन्स चालवतो.
नॉन-एसी लोकल ट्रेन सेवा देण्याव्यतिरिक्त पश्चिम रेल्वे 79 एसी लोकल ट्रेन सर्व्हिसदेखील चालवते. या प्रवाशांमध्ये लोकप्रिय झाल्या आहेत. एकट्या जानेवारी 2023 मध्ये सुमारे 24.53 लाख प्रवाशांनी एसी ट्रेनमधून प्रवास केला होता आणि एप्रिल 2022 पासून अशा प्रवाशांची संख्या 1.79 कोटींहून अधिक झाली आहे. दरम्यान, वांद्रे व बोरिवली स्थानकं स्किप करण्याचा प्रस्ताव असला तरी अंतिम निर्णय हा प्रवाशांच्या फिडबॅकच्या आधारे घेतला जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.