विजय वंजारा, प्रतिनिधी
मुंबई, 30 मे : मुंबईतील कांदिवली येथील गणेश नगर लालजी पाडा येथील ज्वेलरी दुकानाच्या मालकाची रविवारी (28 मे) गोळ्या झाडून हत्या झाल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीला उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून पकडण्यात आले आहे. रिपोर्टनुसार, रोहित पाल असे आरोपीचे नाव आहे. खून केल्यानंतर तो लगेचच ट्रेन पकडत यूपीला पळून गेला. त्याचवेळी घटनास्थळी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली. ज्यामध्ये आरोपी रोहित पाल 32 वर्षीय मनोज सिंह चौहानला गोळ्या घालताना दिसत आहे. दरम्यान, या हत्येमागचे धक्कादायक सत्य समोर आले आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
काय आहे प्रकरण?
कांदिवली पश्चिम येथील एकता नगरच्या आवारात एका व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. चौकशीत हा मृत्यूदेह मनोज चौहान याचा असल्याचं उघडकीस आलं. यानंतर मनोज याचा भाऊ हरिकेश यांच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर तपास सुरू झाला. स्थानिक लोकांकडे चौकशी करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं. तांत्रिक गोष्टी पाहण्यात आल्या. तपासात मनोज याची हत्या त्याची पत्नी हिचा प्रियकर रोहित पाल याने केल्याचं उघडकीस आलं. त्यामुळे पोलीस रोहित याचा शोध घेऊ लागले. यावेळी रोहित पवन एक्सप्रेसने पुन्हा गावी जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याला रस्त्यातच अटक करण्यात आली.
वाचा – प्रेमाचा भयानक शेवट, सैतान प्रियकराचे प्रेयसीवर सपासप वार, राजधानी पुन्हा हादरली
अनैतिक संबंधातून हत्या
रोहित याचे मनोज यांच्या बायकोसोबत अनैतिक संबंध आहेत. गेल्या चारपाच वर्षांपासून हे संबध आहेत. याबाबत मनोज आणि त्याच्या कुटुंबालाही माहीत आहे. यावेळी मनोजच्या कुटुंबाने रोहित याला समजावण्याचा प्रयत्न केला. त्याला मारहाणही करण्यात आली होती. मात्र, तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. मनोजची बायकोही त्याच्याशी संबध तोडत नव्हती. यावेळी रोहित याच्या संबंधात मनोज हा अडथळा ठरत होता. यामुळे 27 मे रोजी रोहित रिव्हॉल्व्हर घेऊन मुंबईत पोहचला. त्याने मनोज याचा शोध घेतला. त्याला गाठलं आणि त्याच्या डोक्यात गोळी झाडली. यात मनोज जागीच ठार झाला.
रोहित याला अटक करून त्याला आज कोर्टात हजर करण्यात आलं. त्याला 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या गुन्ह्यात मनोज याची बायको हिचाही सहभाग होता का? या अँगलने पोलीस तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.