धनंजय दळवी, प्रतिनिधी
मुंबई, 20 एप्रिल : समाज कार्य करण्याची प्रत्येकाची इच्छा असतेच. परंतु सर्वस्व पणाला लावून काम करणारा मात्र एखादाच असतो. त्यापैकीच एक मुंबईतील कुर्ला येथे राहणारे मनोज नाथानी हे आहेत. मनोज नाथानी यांनी मनराज प्रतिष्ठानची स्थापना केलेली आहे. यामधून ते गरजू लोकांची सेवा करत आहेत.
कधी केली मनराज प्रतिष्ठानची स्थापना?
तुमच्या शहरातून (मुंबई)
पेशाने बांधकाम व्यवसायिक असलेले मनोज नाथानी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक उपक्रमाद्वारे समाजातील गरजू लोकांची सेवा करत आहेत. 2010 साली त्यांनी मनराज प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना केली. तर गेल्या पाच वर्षांपासून दर आठवड्याला मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन त्यांच्याकडून करण्यात येते. यासोबतच कुर्ला येथील मा शीला क्लिनिक आणि पैथोलॉजी दवाखाना दररोज सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू असतो. या क्लिनिक मध्ये नागरिकांना मात्र 10 रुपयांमध्ये उपचार मिळतात. त्यांच्याकडून आतापर्यंत 281 मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कशी झाली सुरुवात?
आईचं निधन झाल्यानंतर मा शीला क्लिनिकची सुरुवात करण्यात आली. लोकांना सेवा देण्यासाठी आई-वडिलांनी संस्कार दिले. त्यांची शिकवण आहे की समाजाची सेवा करावी. माझ्या घरच्यांनी जर मला ही शिकवण दिली नसती तर मी आज लोकांसाठी मोफत शिबिराचे आयोजन करू शकलो नसतो. माझी आई माझ्यासोबत नसली तरी तिचे संस्कार आणि तिच्या संकल्पनेने सुरू असलेले क्लिनिक नेहमी माझ्या सोबत असणार आहे, असं मनोज नाथानी सांगतात.
सेवा समाजासाठी देण्याचा प्रयत्न
गेल्या काही वर्षात मोफत आरोग्य शिबिर यामध्ये नेत्र तपासणी, रक्तदान शिबिर, विविध आजारांसंबंधीत तपासण्या लोकांसाठी निशुल्क ठेवल्या जातात. आजपर्यंत विविध धर्माच्या धार्मिक स्थळी तसेच अर्थर रोड जेल, विविध मंडळ, अशा ठिकाणी या शिबिराचे आयोजन केले आहे. तसेच येत्या काळात आणखी काही सेवा समाजासाठी देण्याचा प्रयत्न असल्याचे देखील मनोज सांगतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.