मुंबई, 15 मे : आपली सावली कधीही आपली साथ सोडत नाही, असे म्हणतात. पण ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे, असं नाही. कारण वर्षातील दोन दिवस असे असतात की, त्यादिवशी भर दुपारी काही क्षण आपली सावलीही आपली साथ सोडून देते. याला ‘शून्य सावलीचा दिवस‘ असे म्हटले जाते आणि मुंबईकरांना हा शून्य सावली दिवस आज अनुभवता येणार आहे.
नेमकं काय होणार –
मुंबईकरांना आज सोमवारी दुपारी 12.35 वाजेच्या सुमारास हा शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे. जमिनीवर उभे राहून, पाईपसारखी उभी वस्तू ठेवून निरीक्षण करता येईल. त्यासाठी भूगोल, विज्ञान शिक्षक, अभ्यासक आणइ चिकित्सक नागरिकांनी आपल्या घराजवळ, संस्थेत विद्यार्थी आणि शाळकरी मुलांसाठी जागृती निर्माण व्हावी, म्हणून या वेळेत उपक्रम घेता येईल.
तुमच्या शहरातून (मुंबई)
शून्य दिवस म्हणजे, दिलेल्या वेळेत, सूर्य डोक्यावर आला की आपल्याला आपली किंवा कोणत्याही वस्तूची सावली दिसत नाही. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या अक्षवृत्तावर वेगळे दिवस आणि वेळा आहेत. त्यामुळे सर्व शहरे आणि गावांच्या वेळात काही सेकंदांचा फरक आहे. त्यामुळे आपण दुपारी 12 ते 12.35 या वेळेदरम्यान, सूर्य निरीक्षण करावे. तसेच समूहासाठी उपक्रम करायचा असेल तर मोकळ्या जागी किंवा कौटुंबिक निरीक्षण करायचे असेल तर घराच्या छतावर किंवा अंगणात केले तरी चालेल, असे तज्ञांनी सांगितले आहे.
वर्षातील दोन दिवस वगळता भर दुपारीही सूर्य आकाशात नेमका आपल्या डोक्यावर न आल्याने आपली थोडीतरी सावली दिसतेच. पण वर्षातील दोन दिवशी आपल्या स्थळाचे अक्षांश आणि सूर्याची क्रांती एक होते. त्या दिवशी भर दुपारी सूर्य आकाशात बरोबर आपल्या डोक्यावर असतो. म्हणून आपली सावली नेमकी आपल्या पायाशी आल्याने आपल्याला ती दिसू शकत नाही. त्यामुळे या ठराविक दिवशीच आपणास शून्य सावलीचा अनुभव घेता येतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.