धनंजय दळवी, प्रतिनिधी
मुंबई, 30 मार्च : मुंबईत अनेक मंदिरे आणि शिल्पाकृती आहेत. माहीममध्ये प्रभू श्रीरामाचे 150 वर्षांहून अधिक जुने मंदिर त्यापैकी एक आहे. या मंदिरात उत्सव काळात श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी दररोज हजारो भाविक गर्दी करत असतात. श्रीराम नवमीनिमित्त नेमका या मंदिराचा इतिहास काय? हे मंदिर केव्हापासून सुरू करण्यात आले? या मंदिरात कोणते उत्सव साजरे केले जातात? सध्या या मंदिराची स्थिती जाणून घेऊया.
कधी झाली स्थापना?
तुमच्या शहरातून (मुंबई)
या मंदिराबाबत माहिती देताना मंदिराचे पुजारी अनिरुद्ध पराडकर यांनी सांगितले की, हे मंदिर 1864 साली लाला भन्साळी यांनी बांधलं त्यानंतर बरोबर पन्नास वर्षांनी म्हणजे 1914 पहिलं पाच जणांचं विश्वस्त मंडळ स्थापन झालं. 1964 साली या मंदिराचा शतकपूर्ती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी मी केवळ चार वर्षाचा होतो. मात्र, माझे वडील याच मंदिरात त्यावेळी पुजारी होते. त्यामुळे मला तो उत्सव आजही आठवतो. 1964 साली या मंदिराचे अध्यक्ष होते भाई सबनीस. त्यावेळी सबनीस यांच्या मनात आलं हे मंदिर आता खूप जुनं झालं आहे याचा जिर्णोद्धार करायला हवा. मात्र, त्यावेळी मंदिर प्रशासनाकडे तितके पैसे नव्हते आणि भाविकांची देखील इतकी परिस्थिती नव्हती. त्यामुळे जीर्णोद्धाराची गोष्ट फक्त मनातच होती.
प्रभू श्रीरामाला साद घातली
अनिरुद्ध पराडकर पुढे बोलताना सांगतात, सबनीस हे मंदिराच्या निधीसाठी प्रयत्नशील होते. मात्र, पैशांची जुळवाजुळ काही होत नव्हती. अखेर सबनीस यांनी प्रभू श्रीरामाच्या चरणी मनापासून प्रार्थना केली आणि रामराया तूच यातून काहीतरी मार्ग दाखव अशी प्रभू श्रीरामाला साद घातली. 1992 साली श्री गजानन महाराज सांस्कृतिक महामंडळ मुंबई या संस्थेचे विश्वस्त भाऊ महाराज आणि वसंत गंगाधर गोगटे हे भाई सबनीस यांना भेटायला आले. त्यांनी सबनीस यांना सांगितलं आम्हाला इथे जागा हवी आहे. आम्ही इथे शेगावच्या धरतीवर मंदिराची स्थापना करू शेगावला ज्याप्रमाणे तळघरात गजानन महाराजांची मूर्ती आणि त्यावर श्रीरामाचे मंदिर आहे. त्याच प्रमाणे आम्ही इथे मंदिर बांधून देऊ. अशी ती चर्चा झाली होती.
प्रभू रामाचे दूत आले
सुरुवातीला भाई सबनीसांना कळले नाही की आपण हे काय ऐकतोय. कारण, काही वर्ष प्रभू श्रीरामाच्या मंदिरासाठी पैशांची जमवाजवम होत नव्हती आणि अचानक या महाराजांनी येऊन थेट मंदिर बांधण्याचा प्रस्तावच ठेवला होता. त्यामुळे भाई सबनीस यांचा हा समज पक्का झाला की प्रभू श्रीरामाने गजानन महाराजांच्या करवी हे आपले दूतच पाठवले आहेत. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता या मंदिराच्या पुनर्बांधणीला आपला होकार दर्शवला. त्यानंतर 7 मे 1995 रोजी इथे तळघरात श्री गजानन महाराजांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. त्यावेळी वरती फक्त श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि मारुतीराया इतक्याच मूर्ती होत्या.
Ram Navami Wishes : श्रीराम नवमीनिमित्त WhatsApp Status ला ठेवा सुंदर शुभेच्छा संदेश
कोणते उत्सव होतात साजरे?
या ठिकाणी श्रीराम जन्मोत्सव साजरा केला जातो. इथे उत्सव काळात रोज भजन, कीर्तनाचे कार्यक्रम होत असतात. तर, शेवटच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन असते. त्यावेळी झुणका भाकर दिली जाते. उत्सवाच्या काळात इथे हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात, अशी माहिती मंदिराच्या पुजाऱ्यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.