काँग्रेससह ‘माविआ’च्या नेत्यांनी घेतली मल्लिकार्जुन खर्गेंची विशेष भेट
मुंबई: मुंबईमध्ये विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला होणार आहे. या बैठकीची जबाबदारी महाविकास आघाडीकडे सोपवण्यात आली आहे. या बैठकीच्या तयारी संदर्भात काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी मंगळवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांची भेट घेतली. या बैठकीला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची देखील उपस्थिती होती.
26 पक्षांच्या विरोधी आघाडी असलेल्या ‘इंडिया’ची पुढील बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत आयोजित करण्यात येत आहे. इंडिया आघाडीने यापूर्वी सांगितले होते की, या बैठकीत ते आघाडीची समन्वय समिती, संयुक्त सचिवालय आणि इतर पॅनेलसाठी नावे निश्चित करण्यात येणार आहेत. या विशेष बैठकीच्या तयारी संदर्भात काँग्रेस नेत्यांसह महविकास आघाडीच्या काही निवडक नेत्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांची दिल्लीत भेट घेतली. खर्गे यांच्या संसद भवनातील कार्यालयात झालेल्या बैठकीला महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार संजय राऊत, माजी मंत्री नसीम खान, खासदार अनिल देसाई देखील उपस्थित होते.
या बैठकीविषयी प्रसार माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘इंडिया’च्या विशेष बैठकीबाबत मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील काही पक्ष आमच्या सोबत येतील त्यासंदर्भातही बैठकीत चर्चा झाली. राज्यात ओबीसी मेळावा नागपूरला व्हावा अशी विनंती मी पक्षाकडे करणार आहे. ओबीसी जातनिहाय जनगणना महाराष्ट्रात सुरू झाली पाहीजे. राज्यात ओबीसींची किती संख्या आहे, याची आकडेवारी पुढे आली पाहीजे. यासाठी जिल्हास्तरावर मोर्चा आणि आंदोलने उभी करणार असल्याचेही विजय वडेट्टीवार म्हणाले.
भाजपला देशातील लोकशाही, संविधान संपवायचे आहे, असा आरोप खरगे यांनी केला आहे. भाजप ईडी, सीबीआय या सारख्या संस्थांचा वापर विरोधी पक्षांविरोधात करण्यात येत आहे. देशाला कसे वाचवायचे आणि देशातील लोकांना कसे वाचवायचे हे आव्हान आहे. देशासाठी आम्ही एकत्र येत आहोत, असे खरगे म्हणाले.