मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कथितपणे पासपोर्ट बदलल्यानंतर, दोन आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी एकमेकांच्या ट्रॅव्हल डेस्टिनेशन्ससाठी उड्डाण केलं. विमानतळावरील शौचालयात श्रीलंकेचा मूळ रहिवासी असलेला नागरिक आणि जर्मन नागरिक यांच्यात ही देवाण-घेवाण झाली. एका अधिकाऱ्यानं गुरुवारी सांगितलं की, या दोन्ही प्रवाशांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
पीटीआयच्या एका वृत्तामध्ये म्हटलं आहे की, 22 वर्षीय श्रीलंकेचा नागरिक 36 वर्षीय जर्मन नागरिकाच्या पासपोर्टसह लंडनला गेला. तर, जर्मन नागरिक काठमांडूला गेला. श्रीलंकन प्रवासी ब्रिटनमध्ये आल्यानंतर त्याला विमानतळ अधिकाऱ्यांनी पकडलं आणि त्याला पुन्हा मुंबईला पाठवण्यात आलं. चौकशीदरम्यान त्यानं पोलिसांना सांगितलं की, त्याला करिअरच्या चांगल्या संधी शोधण्यासाठी यूकेला जायचं होतं.
तुमच्या शहरातून (मुंबई)
लंडन विमानतळावरील अधिकाऱ्यांसमोर आपलं बिंग फुटल्याचं लक्षात आल्यानंतर लंकन नागरिकानं त्यांच्या समोर आपली मूळ ओळख उघड केली, असंही पीटीआयच्या वृत्तामध्ये म्हटलं आहे.
काठमांडूला जाणारा बोर्डिंग पास असलेल्या जर्मन नागरिकालाही पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाच्या चौकशीत असं निदर्शनास आलं की, 9 एप्रिल रोजी हे दोन्ही प्रवासी मुंबईतील विमानतळाजवळील एका आलिशान हॉटेलमध्ये थांबले होते. तेव्हाच त्यांनी त्यांचे बोर्डिंग पास बदलण्याची योजना आखली होती, असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं.
अधिकाऱ्यानं सांगितलं की, श्रीलंकन नागरिकाच्या पासपोर्टवरील डिपार्चर स्टॅम्प बनावट असल्याचं विमान कंपनीच्या अटेंडटच्या लक्षात आलं होतं. पासपोर्टवरील डिपार्चर स्टॅम्प क्रमांक हा त्याच्या बोर्डिंग पासवरील स्टॅम्प क्रमांकापेक्षा वेगळा होता. त्यानंतर तिनं विमानतळावरील अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली. त्यांनी लंकन प्रवाशाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि हा सर्व प्रकार उघडकीस आला.
Viral Video : गायीने वृद्धाला उडवलं, पण वासराला पाहाताच मारला ब्रेक
सहार पोलिसांनी या दोन्ही प्रवाशांविरोधात फसवणूक, खोटारडेपणा आणि गुन्हेगारी कट या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात आणखी लोकांचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.
श्रीलंकन प्रवाशाचा लंडनला जाण्याचा उद्देश चौकशीत समोर आला आहे. मात्र, जर्मन प्रवाशाचा काठमांडूला जाण्याचा उद्देश अद्याप समोर आलेला नाही. एकमेकांच्या पासपोर्टचा किंवा बोर्डिंग पासचा वापर करून प्रवास करणं, हा कायदेशीर गुन्हा आहे. मात्र, तरीही काही अति-आत्मविश्वासू व्यक्ती अशाप्रकारे प्रवास करण्याचं धाडस करतात आणि शेवटी त्यांना शिक्षा भोगावी लागते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.