मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई आणि औरंगाबादमध्ये सभा घेणार असून विरोधी पक्षांच्या आरोपांवर हल्लाबोल करणार असल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. आज पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हिंदुत्ववाद व विरोधी पक्षांवर निशाणा साधला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. लवकरच त्यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख जाहीर केली जाणार आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महिन्याच्या 14 तारखेला मुंबईत बीकेसीमध्ये आणि 8 जूनला मराठवाड्यात सभा घेणार आहेत. त्याशिवाय ते अयोध्येचा दौराही करणार असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात आलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या प्रवक्त्यांची एक बैठक ‘वर्षा’ या निवासस्थानी बोलावली होती. त्यामध्ये हा आदेश दिला आहे. दरम्यान, ही पक्षाची अंतर्गत बैठक होती असं संजय राऊत म्हणाले. राज ठाकरेंनी 3 मे पर्यंत मशिदींवरील भोंगे हटवावेत अन्यथा त्या समोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्यात येईल असा इशारा दिला आहे. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी करून हिंदुत्वाच्या मुद्द्याला बगल दिल्याची टीका भाजप आणि मनसेकडून केली जात आहे. याच मुद्द्यावरून येत्या 1 मे रोजी त्यांची औरंगाबादमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.