बंगळुरू, 18 मे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर राज्यात मुख्यमंत्रीपदाचा पेच काँग्रेससमोर निर्माण झाला होता. अखेर हा तिढा सुटला असून पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धरामय्या कर्नाटकचे मुख्यमंत्री असतील तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री होतील. दरम्यान, डी के शिवकुमार काल सायंकाळपर्यंत होईन तर मुख्यमंत्रीच अन्यथा काहीच नाही यावर ठाम होते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी डीके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपदासह महत्त्वाची खाती देण्याचा प्रस्ताव दिला गेला. पण ते सतत मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही होते.
सिद्धरामय्या यांनी त्यांना आमदारांचे समर्थन असल्याचं सांगत मुख्यमंत्रीपदावर दावा केला. 2024 मध्ये सामाजिक समीकरणे लक्षात घेऊन वरिष्ठांनीसुद्धा त्यांच्याकडेच मुख्यमंत्रीपद सोपवण्याच्या विचारात होते. जवळपास चार दिवस यासाठी बैठका सुरू होत्या. शेवटी बुधवारी रात्री माजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी प्रश्न सोडवल्याचं म्हटलं जात आहे. सध्या शिमल्यात असलेल्या सोनिया गांधी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून डीके शिवकुमार यांच्याशी चर्चा केली. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि रणदीप सुरजेवाला हेसुद्धा उपस्थित होते.
शेतकरी, वकील, राजकारणी… कर्नाटकचा कायापालट करणाऱ्या सिद्धरामय्यांचा प्रवास
सोनिया गांधी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर डीके शिवकुमार हे उपमुख्यमंत्रीपदासाठी तयार झाले. सोनिया गांधी यांनी डीके शिवकुमार यांना पक्षनिष्ठा आणि त्याग याचं फळ नक्की मिळेल. त्याकडे कोणी दुर्लक्ष करू शकत नाही असं म्हटलं. काँग्रेसकडून कर्नाटकात तिघांची समिती आज बंगळुरूत जाणार आहे. याठिकाणी काँग्रेसच्या विधिमंडळ गटाची बैठक होईल. यावेळी सिद्धरामय्या यांच्या नावाची घोषणा औपचारिकरित्या होणार आहे. नवं सरकार २० मे रोजी स्थापन होईल.
डीके शिवकुमार यांनी गेल्या चार वर्षांच्या कामाचा दाखला देत मुख्यमंत्रीपदासाठी दावा केला होता. मंगळवारी दिल्लीला जाण्याआधीही त्यांनी पद मिळावं म्हणून कोणाला ब्लॅकमेल करणार नाही असं सांगितलं होतं. काँग्रेस माझ्यासाठी आईच्या स्थानी आहे आणि मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे असं म्हटलं होतं. डीके शिवकुमार यांनीच आज सायंकाळी बैठक बोलावली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.