ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी
कोल्हापूर, 26 एप्रिल : कोल्हापूरचे राजकरण म्हंटल की बंटी आणि मुन्ना या दोन नावांशिवाय पुढं सरकत नाही. दिल्लीतल्या लोकसभेची निवडणूक असो की गल्लीतल्या सोसायटीची या दोन गटात राजकीय संघर्ष ठरलेला आहे. मात्र, आत्ताचे राजकीय वैरी एकेकाळचे चांगले दोस्त होते. राम लखन सारखी त्यांची जोडी होती. कॉलेज जीवनात या दोघांच्या मैत्रीने बहार आणला होता. दंगा मस्ती मौजमज्जा सगळं या मैत्रीत होते. एकमेकाला घेतल्याशिवाय कोठेही दोघे बाहेर जात नव्हते. एकमेकांची घरे तर दोघांसाठीही हक्काने उघडी असायची. एका ताटातही दोघे जेवायचे. तर एकमेकांच्या अडचणीला उभे ठाकायचे पण राजकारणाने या दोघांच्यात दुरावा आणला आणि दोघे एकमेकांना आता अडचणीत आणू लागले आहेत.
तुमच्या शहरातून (कोल्हापूर)
खरंतर या दोघांची मैत्री शिवाजी विद्यापीठाच्या स्टुडंट कौन्सिलच्या निवडणुकींतून सुरू झाली. दोघेही अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभे होते. त्यावेळी जिल्ह्याच्या राजकारणावर एकहाती पकड असलेल्या माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी या दोघांमधून सतेज पाटलांना अध्यक्ष केले आणि या दोघांच्यात मैत्रीचा बांध बांधला. सुमारे 10 ते 15 वर्षे त्यांची ही मैत्री अबाधित होती. या दरम्यान 2004 सतेज पाटलांनी आमदारकी लढवली या निवडणुकीची सगळी धुरा धनंजय महाडिक या मित्राने खांद्यावर घेतली आणि सतेज पाटलांना पहिला गुलाल लागला. त्यानंतर ध्यानी मनी नसताना 2009 ची लोकसभा निवडणूक धनंजय महाडिकांनी लढण्याचा निर्धार केला. मात्र, महाडीकाना राष्ट्रवादीने उमेदवारी देऊ नये असे कोल्हापुरातल्या पाच आमदारांनी पत्र दिले होते. त्यामध्ये सतेज पाटलांचेही नाव असल्याने धनंजय महाडिक चांगलेच खवळले. त्यातूनच या दोघांच्यात वितुष्ट निर्माण झालं ते आजतागायत कायम आहे.
वाचा – ‘मी अजितदादांसाठी धावत पळत आलो अन् ते..’ बैठकीला गैरहजर राहिलेल्या पवारांना पाटलांचा चिमटा
कोल्हापूरच्या राजकारणातले दोन दिग्गज घराणे आणि युवा नेतृत्व म्हणून या दोघांकडे पाहिले जात होते. दोघेही व्हिजनरी असलेले नेते आहेत. त्यामुळे या दोघांनी राजकीय वाटण्या करून घेतल्या असत्या तर जिल्ह्याचा मोठा विकास झाला असता असे काहींचे म्हणणे आहे. मात्र, या दोघांनी एकत्र येऊच नये असे काहीजण राजकारण खेळत असल्याच या दोघांच्या मित्रांचे म्हणणे आहे.
खरंतर महाडिक आणि पाटील हे घराणे पैलवानकीशी संबंधित आहे. त्यामुळे पैलवानकितला दोस्तीत दोस्ती आणि कुस्तीत कुस्ती हा नियम जरी दोघांनी पाळला असता तर दोघांच्यातली दोस्ती कायम राहिली असती. आताही या दोघांच्यातले वाद मिटावेत आणि दोघे एक व्हावेत अशी अनेकांची इच्छा आहे. मात्र, पुढाकार कोण घेणार हाच खरा प्रश्न आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.