मुंबई, 10 एप्रिल : क्रिकेटच्या मैदानात अशक्यप्राय वाटणारं आव्हान केकेआरच्या रिंकू सिंगने पेललं. सलग पाच षटकार खेचत रिंकू आयपीएलचा नवा हिरो बनलाय. गतविजेत्या गुजरात टायटन्सच्या तोंडातून रिंकू सिंगनं विजयाचा घास अक्षरश: हिरावून घेतला. रिंकूने त्याच्या खेळीतील अखेरच्या ७ चेंडूत तब्बल ४० धावा कुटल्या. यात ६ षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता.
केकेआरच्या डावातील १९ व्या षटकात पाचव्या चेंडूवर रिंकूने षटकार मारला. त्यानतंर अखेरच्या चेंडूवर चौकार गेला. अखेरच्या षटकात विजयासाठी २९ धावा हव्या होत्या. पहिल्या चेंडूवर उमेश यादवने एक धाव घेतली आणि स्ट्राइक रिंकूकडे आला. रिंकूने त्यानंतर एकापाठोपाठ पाच षटकार मारत केकेआरला आशक्यप्राय असा विजय मिळवून दिला.
Rinku Singh : तीन दिवसांपूर्वी ज्याने कौतुक केलं त्यालाच रिंकूने चोपले; कोण आहे यश दयाल?
अखेरच्या षटकात पाच चेंडूवर पाच षटकार मारणाऱ्या रिंकूचीच सध्या चर्चा आहे. क्रिकेटविश्वाला एकच प्रश्न पडला कोण आहे हा रिंकू सिंग? रिंकू सिंग उत्तर प्रदेशातल्या अलीगढमधला आहे. 25 वर्षांच्या रिंकू सिंगला 4 भावंड आहेत. त्याचे वडील सिलेंडर पोहोचवण्याचं काम करतात. आई गृहिणी आहे. त्याचा एक भाऊ ऑटो चालवतो. गरीब कुटुंबातून आलेल्या रिंकूला क्रिकेटची प्रचंड आवड होती. ही आवड जोपासताना त्याला झाडू मारण्याचं कामंही करावं लागलं होतं. मात्र तरीही रिंकूनं क्रिकेटवरचं त्याचं लक्ष विचलित होऊ दिलं नाही.
यूपीच्या अंडर 16, अंडर 19 आणि अंडर 23 टीममधून रिंकू खेळला. 2017 मध्ये त्याला किंग्स इलेव्हन पंजाबनं आयपीएलसाठी टीममध्ये घेतलं. पंजाबकडून रिंकूला फारशी संधी मिळाली नाही. पण रिंकूचं नशीब तेव्हा चमकलं जेव्हा केकेआरनं त्याला 80 लाखांची बोली लावून विकत घेतलं. वडील 10-12 हजार महिन्याला कमवतात असल्यानं त्याच्यासाठी 80 लाख ही फार मोठी रक्कम असल्याचं रिंकूनं तेव्हा म्हटलं होतं.
IPL 2023 : ‘हट रे’, कॅमेरामनवर भडकली काव्या मारन; VIDEO VIRAL
रिंकूच्या या यशानंतर आपला मुलगा पुढे देशासाठी खेळावा असं त्याच्या आईला वाटतं. तर वडीलांनी रिंकूचा खूप अभिमान वाटत असल्याचं म्हटलंय. मी रिंकूला क्रिकेट खेळू नको म्हणायचो, शाळा शिक सांगायचो. पण त्यात रस नव्हता त्याला. स्टेडियमला जायचा आणि क्रिकेट खेळायचा. तेव्हा लोक सांगायचे तुमचा मुलगा असा खेळला, सिक्स मारला. मी कधीच विचार केला नव्हता क्रिकेटमध्ये इतकं करिअर करेल. तो माझ्यासोबत सिलिंडर पोहोचवायचं काम करायचा, फरशी पुसायचं कामही केलं. आज माझी छाती गर्वाने फुगलीय. रिंकू त्याच्या मर्जीने लग्न करेल. तो आयपीएलमध्ये संघासाठी चांगलं खेळतोय, भारतासाठी खेळेल असा विश्वास रिंकूच्या वडिलांनी व्यक्त केला.
घरकाम करणारा मुलगा इतकं करेल असं वाटलं नव्हतं. माझ्या मुलाने खूप काही केलंय. घरची परिस्थिती कठीण होती. आता परिस्थिती सुधारलीय. त्याने मला पाच वर्षांपुर्वीच काम सोडायला सांगितलं होतं. पण मी स्वत:च नकार दिला. काम करायचं बंद केलं तर हातपाय चालणार नाहीत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.