गुजरात न्यायालयाने मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा केली होती.
Delhi News : सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर काँग्रेस राहुल गांधींना त्यांची खासदारकी पुन्हा एकदा बहाल करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयात याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे आता राहुल गांधींना उद्या मोदी सरकारविरोधात मांडल्या जाणाऱ्या अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेत सहभागी होता येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा संसदेत राहुल गांधींचा आवाज घुमणार असल्याचे निश्चित झाले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या ४ ऑगस्टच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या अपात्रतेचा निर्णय मागे घेत असल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे. लोकसभेचे सरचिटणीस उत्पल कुमार सिंह यांच्या आदेशाने जारी करण्यात आलेल्या या अधिसूचनेत, 24 मार्च 2023 रोजी लोकप्रतिनिधी कायदा, 1951 चे कलम 8 पुढील न्यायालयाच्या आदेशापर्यंत स्थगित करण्यात येत आहे, असे म्हटले आहे.
वायनाडमधून राहुल गांधींचे सदस्यत्व बहाल केल्यानंतर ते आजपासूनच संसदेच्या अधिवेशनाला उपस्थित राहू शकतात, अशी अपेक्षा आहे. आज राज्यसभेत दिल्ली सेवा विधेयकावर चर्चा होणार आहे. त्याचबरोबर लोकसभेत मणिपूर हिंसाचारावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
राहुल यांचे सदस्यत्व बहाल झाल्यानंतर आजपासून संसदेतील चित्र बदलणार आहे. राहुल गांधींच्या शिक्षेला स्थिगिती मिळाल्याने काँग्रेसमध्ये नवे प्राण फुंकले आहे. विरोधक आता अधिक आक्रमक होऊन सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करणार असल्याचे मानले जात आहे.
राहुल गांधींचे सदस्यत्व बहाल करण्यात दिरंगाई केल्याच्या काँग्रेसच्या आरोपावर केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लोकसभा अध्यक्षांपर्यंत पोहोचताच राहुल यांचे सदस्यत्व बहाल करण्यात आले. नियमानुसार निर्णय घेण्यात आल्याचे प्रल्हाद जोशी यांनी सांगितले. तसेच . सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शनिवार आणि रविवार असल्याने संसदेचे कामकाज बंद होते. पण हा आदेश लोकसभेत पोहोचताच राहुल गांधी यांचे सदस्यत्व तत्काळ बहाल करण्यात आल्याचंही जोशी यांनी स्पष्ट केलं.