मुंबई,24 मे- मनोरंजनसृष्टीला पुन्हा एक धक्का बसला आहे. नुकतंच अभिनेत्री वैभवी उपाध्यायच्या निधनाची बातमी समोर आली होती. चाहते आणि सेलिब्रेटी या धक्क्यातून अजून सावरलेही नाहीत तोपर्यंत आता ‘अनुपमा’ फेम अभिनेता नितेश पांडेनेही जगाचा निरोप घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ही बातमी समोर आल्यानंतर संपूर्ण मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे.
मनोरंजन विश्वासाठी हा आठवडा अतिशय दुःखद ठरला आहे. आदित्य सिंग राजपूत, सुचंद्रा दासगुप्ता नंतर वैभवी उपाध्याय आणि आता नितेश पांडे यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण मनोरंजन विश्व हादरलं आहे. अशाप्रकारे प्रतिभावान अभिनेत्यांनी निरोप घेणं चाहत्यांना आणि टीव्ही सेलिब्रिटींना त्रासदायक ठरत आहे. हृदयविकाराच्या झटक्याने 51 वर्षीय नितेश पांडे यांचं निधन झालं आहे.
नीतेश पांडे हे टीव्ही जगतातील एक अतिशय लोकप्रिय चेहरा होते. त्यांनी अनेक मालिकांमध्ये दमदार सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. मालिका विश्वातील लोकप्रिय भाऊ-वडील यांच्या भूमिकांसाठी त्यांना ओळखलं जातं. नीतेश यांच्या अचानक जाण्याने सेलिब्रेटींसह चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
नितेश पांडे यांचा जन्म 17 जानेवारी 1973 रोजी झाला होता. अभिनयाची आवड असलेल्या नितेश यांनी 1990 मध्ये थिएटरपासून करिअरची सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी टीव्ही जगतात प्रवेश केला होता. ‘मंजिले अपनी अपनी’, ‘अस्तित्व एक प्रेम कहानी’, ‘साया’, ‘जुस्तजू’, ‘दुर्गा नंदिनी’ यांसारख्या शोमध्ये ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. रुपाली गांगुलीच्या प्रसिद्ध शो ‘अनुपमा’मध्ये ते धीरज कपूरच्या भूमिकेत दिसत होते. नितेश यांचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊसदेखील आहे. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी 1998 मध्ये अभिनेत्री अश्विनी कालेस्करशी लग्न केलं होतं. मात्र 2002 मध्ये ते विभक्त झाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.