इस्लामाबाद, 11 मे : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मंगळवारी अटक करण्यात आली होती. अखेरीस पाकमधील सुप्रीम कोर्टाने इम्रान खान यांची अटकही बेकायदेशीर ठरवली असून तातडीने सोडण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे इम्रान खान यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष सुरू केला आहे.
आज सुप्रीम कोर्टामध्ये इम्रान खान अटक प्रकरणावर सुनावणी झाली. यावेळी इम्रान खान यांनी आपल्यासोबत कोठडीत चुकीची वागणूक दिली, एखाद्या दहशतवाद्याप्रमाणे आपल्याला लाठ्या काठ्याने मारहाण केली, असा खुलासाच इम्रान खान यांनी केला. तसंच, एखाद्या दहशतवाद्याप्रमाणे आपल्याला जेलमध्ये ओढत नेलं, असंही त्यांनी सांगितलं.
(From PMO to Jail : अटक- तुरुंगवास ते फाशी, इम्रान खान पहिलेच नाहीत, 6 पंतप्रधानांनी गाजवलेत किस्से)
इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात युद्धासारखी स्थिती निर्माण झाली आहे. परिस्थिती चिघळू नये म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. PTI ने पोलिसांवर गोळीबार केल्याचा आरोप लावला आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाकिस्तानात ठिकठिकाणी कलम 144 लागू करण्यात आलं आहे. जे या कलमाचं उल्लंघन करतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. देशात अराजकता आणि अस्थिरता वाढली आहे. सरकार आणि पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
इम्रान यांच्यावर कोणते आहे आरोप?
इम्रान खान यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. सरकारी तोशाखान्यातल्या वस्तू परदेशात विकल्याचा आरोप इम्रान खान यांच्यावर करण्यात आले. पंतप्रधानपदाच्या काळात वेगवेगळ्या देशांतून मिळालेल्या भेटवस्तू इम्रान खान यांनी परदेशात जास्त किंमतीला विकल्या, यातल्या काही भेटवस्तू त्यांनी पत्नी बुशरा बीबी यांनाही कोट्यवधी रुपयांना विकल्याचा दावा करण्यात येत आहे. महागड्या भेटवस्तूंमध्ये महागडं घड्याळ, हिरे, दागिन्यांचा समावेश आहे. या आरोपांनंतर इम्रान खान यांचं संसद सदस्यत्व रद्द करण्यात आलं, त्यामुळे इम्रान खान यांच्यावर निवडणूक लढवण्यासाठी 5 वर्षांची बंदी घालण्यात आली. मात्र, माझ्यावर कोणताही खटला दाखल करण्यात आलेला नाही, तरीही त्यांना मला जेलमध्ये टाकायचं आहे, यासाठी मी तयार आहे. माझ्या हत्येचा दोन वेळा कट रचला गेला, असा आरोप इम्रान खान यांनी केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.