सोलापूर, 8 मे : शरद पवार काल सोलापूर दौऱ्यावर होते. शरद पवारांच्या हस्ते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बायोगॅस सीएनजी प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. यावेळी कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. अभिजीत पाटील यांना स्वत: शरद पवार यांनी फेटा बांधला. सोबतच शरद पवार यांनी अभिजित पाटलांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब देखील केलं आहे. मात्र शरद पवारांच्या या निर्णयामुळे कल्याण काळे आणि भालके गट नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
भालके गट नाराज?
या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आज कल्याण काळे आणि भगीरथ भालके हे शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आहेत. पंढरपुरात पवारांनी भाकरी फिरवल्याने कल्याण काळे आणि भालके गट नाराज असल्याची चर्चा आहे. नाराजीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. अभिजीत पाटील यांना पंढरपूरमधून उमेदवारी देण्याचे संकेत शरद पवार यांनी दिले आहेत. त्यामुळे भालके गट नाराज आहे. या नाराजीचा फटका भविष्यात पंढरपूर मतदारसंघात राष्ट्रवादीला बसू शकतो. आता शरद पवार काय भूमिका घेणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
तुमच्या शहरातून (सोलापूर)
शरद पवार यांनी काय म्हटलं होतं?
भारत भालके यांच्या निधनानंतर या तालुक्यात नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झालीये. ती भरून काढण्याचं काम अभिजीत पाटील हे करतील. पुढच्या निवडणुकीला पंढरपूरचा राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर अभिजीत पाटील हे असलं पाहिजे. आज तुम्ही अभिजीत यांचं नेतृत्व तयार केलंय आता त्यांच्या पाठिशी उभं राहणं आमचं काम असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे, त्यामुळे एकप्रकारे शरद पवार यांनी अभिजीत पाटलांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तबच केल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.