मुंबई, 04 मे : राज्याच्या राजकारणामध्ये घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे राष्ट्रवादीमध्ये शरद पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे वातावरण ढवळून निघाले आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यपाल बैस यांच्या भेटीसाठी राजभवनावर पोहोचले आहे. सध्याच्या राजकीय वातावरणामध्ये त्यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संध्याकाळी अचानक राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीला पोहोचले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल दोघे जण स्नेहभोजन करणार आहेत. मात्र सध्या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या घडामोडींमुळे या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद देखील राजभवन येथे उपस्थित आहेत. रामनाथ कोविंद आज दुपारपासून राजभवनात पोहोचले आहे. कोविंद तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे हे कोविंद यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
(बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना मोठा दिलासा)
तुमच्या शहरातून (मुंबई)
विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री बदलाची चर्चा रंगली आहे. अजित पवार हे काही आमदारांसह भाजपमध्ये सामील होणार असे अंदाज बांधले जात आहे. या सगळ्या घडामोडींमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कमालीचे अस्वस्थ झाल्याचे पाहण्यास मिळाले. अजितदादांची चर्चा रंगली असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 3 दिवस आपल्या गावी गेले होते. मुख्यमंत्री शिंदे हे अचानक रजेवर गावी गेल्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं.
(‘शरद पवारांचा राजीनामा म्हणजे घडवून आणलेलं..’ इम्तियाज जलील यांचं वक्तव्य)
जेव्हा मुख्यमंत्री शिंदे मुंबईकडे रवाना झाले होते तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. मुंबईत परतल्यानंतर नियमितपणे मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या कामाला सुरुवात केली होती. त्यानंतर आज एकनाथ शिंदे हे राज्यपालांच्या भेटीला पोहोचले आहे. त्यामुळे या राजकीय घडामोडींमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.