वाराणसी, 23 मे : उत्तर प्रदेशातील दोन भटक्या कुत्र्यांचा पासपोर्ट तयार झाला असून त्यांना थेट परदेशात जाण्याची संधी मिळणार आहे. वाराणसीच्या रस्त्यावर फिरणाऱ्या मोती आणि जया या कुत्र्यांचे नशिब चमकले आहे. दोघांपैकी एक इटलीला तर दुसरा नेदरलँडला जाणार आहे. जून महिन्यात मोती आणि जया परदेशात जातील. वाराणसीतून परदेशात जाणारे हे पहिलेच स्ट्रीट डॉग्स असतील.
इटलीत राहणाऱ्या वीरा आणि नेदरलँडमधील मिरल हे काही दिवसांपूर्वी वाराणसी फिरायला आले होते. तेव्हा वाराणसीच्या रस्त्यावर फिरणारे मोती आणि जया यांना त्यांचा लळा लागला. शेवटी एका एनजीओच्या मदतीने त्यांनी कुत्र्यांना दत्तक घेण्यासाठी कायदेशीर प्रकिया पूर्ण केली. कागदपत्रांची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर दोन्ही कुत्र्यांना परदेशात नेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
लग्नात ही एक चूक पडली महागात, महापालिकेनं थेट नवरदेवावरच केली कारवाई
प्राण्यांसाठी काम करणाऱ्या एनिमोटल संस्थेचे संदलीप सेन गुप्ता यांनी सांगितले की, जया नावाची कुत्री मुन्शी घाटाजवळ फिरायची. या गल्लीत दुसऱ्या भटक्या कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला. यात जया जखमी झाली होती. तिथूनच नेदरलँडची मिरल जात होती. तिने कुत्रीची मदत केली आणि तिच्यावर उपचार केले. आता मिरल तिला घेऊन नेदरलँडला जाणार आहे.
संदलीप सेन गुप्ता यांनी सांगितले की, मोती कुत्रा अस्सी घाटावर जखमी अवस्थेत होता. त्याला इटलीच्या वीराने जखमी अवस्थेत उपचारासाठी नेलं होतं. त्याच्यावर उपचार केल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया करून इटलीला नेण्याची तयारी पूर्ण झाली आहे. मोती 14 जुलै रोजी इटलीच्या मिलान विमानतळावर उतरेल. तर जया ऑगस्टच्या अखेरच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरमध्ये नेदरलँडला जाईल.
जिओ टॅगिंग चीप लावणार
परदेशात पाठवण्याआधी दोन्ही कुत्र्यांना जिओ टॅगिंग मायक्रो चीप लावण्यात येणार आहे. त्यावर 15 अंकी आयडेंटीफिकेशन नंबर असणार आहे. जया सहा महिन्यांची असून तिला लसीकरण देण्यात आलं आहे. तसंच इतर तपासण्याही केल्या जात असल्याची माहिती संदलीप सेनगुप्ता यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.