मुंबई, 10 एप्रिल : अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी आणि शिवसेना ठाकरे गटाकडून सातत्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवी प्रकरणात आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उच्च न्यायालयानं 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी असं कोणतं कॉलेज आहे जे गर्वाने सांगण्यासाठी पुढे नाही येणार की आमच्या कॉलेजमधून देशाच्या पंतप्रधानांनी पदवी घेतली, असं म्हणत त्यांनी मोदींवर निशाणा साधला होता. याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारले असता ते या प्रश्नावर चांगलेच संतापले. हा असा मुद्दा आहे ज्यावर कधीही चर्चा होऊ शकते, मात्र सध्या देशापुढे अनेक असे प्रश्न आहेत ज्यावर चर्चा व्हायला हवी असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले पवार?
यावेळी बोलताना शरद पवार यांनी म्हटलं की, सध्या देशात गरिबी, महागाई, बेरोजगारी यासारखे अनेक प्रश्न आहेत. त्यावर नेत्यांनी लक्ष देणं, चर्चा घडवून आणणं महत्त्वाचं आहे. जे मुद्दे आनावश्यक आहे त्यावर कधीही चर्चा होऊ शकते. ठाकरे गट आणि केजरीवाल यांच्याकडून वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीचा मुद्दा उपस्थित केला जात आहे, याबाबत बोलताना शरद पवार यांनी रोखठोक भूमिका घेतल्याचं दिसत आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
जेपीसीवर पवारांची भूमिका
दोनच दिवसांपूर्वी अदानी प्रकरणात जेपीसीची आवश्यकता नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं होतं. यावरून सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून जेपीसीची मागणी करण्यात आली होती. मात्र जेपीसीची नियुक्ती केल्यास त्यामध्ये सर्वाधिक सदस्य हे सत्ताधारी गटाचे असतील त्यामुळे त्याचा काही उपयोग होणार नाही. मात्र जर जेपीसी स्थापन करायची असेल तर करा, अशी भूमिका पवार यांनी घेतली आहे. तसेच अदानी यांना जाणून बुजून टार्गेट केलं असावं असं आम्हाला वाटत असल्याचंही शरद पवार म्हणाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.