पुणे, 7 मे : शरद पवार यांनी आपल्या लोक माझे सांगती या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाच्या प्रकाशन सोहळ्यात अचानक राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला होता. शरद पवार यांच्या या निर्णयाने राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांना धक्का बसला मात्र त्यानंतर शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेतला. यावेळी शरद पवारांची जी पत्रकार परिषद झाली, त्या पत्रकार परिषदेला अजित पवार हे उपस्थित नव्हते. यावरून पुन्हा एकदा अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.
अजित पवारांचं स्पष्टीकरण
मात्र आता खुद्द अजित पवार यांनीच आपण पत्रकार परिषदेला का उपस्थित नव्हतो याबाबत खुलासा केला आहे. पवारांच्या राजीनाम्याचा विषय आता संपला आहे. आम्ही आमच्या कामाला सुरुवात केली आहे. त्या दिवशी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली मात्र माझ्या नियोजित कार्यक्रमामुळे या पत्रकार परिषदेला मला उपस्थित राहाता आले नाही. तसेच शरद पवारांच्या आदेशामुळेही या पत्रकार परिषदेला उपस्थित राहाता आले नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
तुमच्या शहरातून (पुणे)
शरद पवार बोलतील तीच भूमिका
पुढे बोलताना ते म्हणाले की, शरद पवार बोलतील तीच पक्षाची भूमिका आहे. महाविकास आघाडी होती, आहे आणि भविष्यात राहील. तीला कुठेही धक्का लागणार नाही. माझ्यावर आती प्रेम करणारे लोक संभ्रम निर्माण करत आहेत. काहींना माझं काम बघवत नाही, असंही यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरेंना टोला
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना देखील जोरदार टोला लगावला आहे. राज ठाकरे यांना मिमिक्री करण्याशिवाय दुसरं काही जमत नाही. त्यांना जनतेनं नाकारल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.