यंदा मुंबईत येत्या गुढी पाडव्याला निघणार्या मराठी नववर्षाच्या स्वागतयात्रा जमावबंदीच्या तडाख्यात सापडल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई पोलिसांनी 8 एप्रिलपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू केल्यामुळं गिरगावात स्वागतयात्रा निघणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर गुढीपाडवा आणि रामनवमी मिरवणुकांना परवानगी देण्याची मागणी भाजपनं ठाकरे सरकारकडे केली आहे. एवढंच नाहीतर हिंदूंच्या सणाला परवानगी देताना हाताला का लकवा भरतो? असा सवाल करत आशिष शेलारांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. दरम्यान, तब्बल दोन वर्षांनंतर गुढीपाडव्याला मराठी नववर्षाच्या स्वागत यात्रा निघतील अशी आशा होती. या आशेवर पोलिसांनी लागू केलेल्या जमावबंदीनं पाणी फेरलं आहे.
मुंबईतल्या गिरगावात गुढीपाडव्या निमित्तानं गेल्या काही वर्षांमध्ये दोन स्वागत यात्रा निघत असतात. यातील स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानतर्फे यंदा यात्रा न काढता बंदिस्त सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर, शिवसेनेच्या स्वागत यात्रेत आरोग्य गुढीचं पूजन करुन यात्रेला सुरुवात होणार आहे. तसेच, विलेपार्ले येथील पार्लेश्वर मंदिरात गुढी उभारून सण साजरा करण्यात येणार आहे.
दरम्यान, मुंबईत गुढीपाढव्याबाबत महापालिकेच्या नियमावलीची प्रतिक्षा आहे. जमावबंदीच्या पार्श्वभूमीवर शोभायात्रांवर निर्बंध येणार का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच सध्या राज्यासह मुंबईतही कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. एकीकडे साधेपणानं सण साजरे करावेत, असं आवाहन केलं जात असताना, दुसरीकडे शिवसेनेकडूनच मोठ्या जल्लोषात भव्य शोभायात्रांचं नियोजन केलं जात आहे. त्यामुळे लोकांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे.