नवी दिल्ली 09 मे : कोणाचं नशीब कधी चमकेल, हे अजिबात सांगता येत नाही. अनेकजण गाडी, बंगला, बँक बॅलन्स यासंबंधी स्वप्नं पाहतात. पण अनेकदा त्यांच्या पदरी निराशाच येते. पण प्रत्यक्ष काही लोकांसोबत असं घडतं की, त्यावर लवकर विश्वास बसत नाही. आताच हेच पहा ना, एक महिला जी बेघर होती, तिच्याकडे खाण्यासाठी आणि दैनंदिन गरजा भागविण्यासाठी पैसे नव्हते, पण त्या महिलेचं नशीब असं काही पालटलं की ती एका झटक्यात 40 कोटींची मालकिण बनली. लुसिया फोर्सेथ असं या महिलेचं नाव असून त्या अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये राहतात.
लुसिया फोर्सेथ या महिलेला नुकतीच 5 मिलियन डॉलर म्हणजे अंदाजे 40.91 कोटी रुपयांची लॉटरी लागलीय. त्यामुळे ती आता एवढा मोठा जॅकपॉट जिंकणाऱ्या जगातील मोजक्या लोकांपैकी एक बनली आहे. जेव्हा कॅलिफोर्निया लॉटरी अधिकार्यांनी लॉटरी जिंकल्याबद्दल त्यांच नाव जाहीर केलं, तेव्हा त्या ढसाढसा रडल्या. कारण एवढ्या मोठ्या रक्कमेची लॉटरी लागली आहे, यावर त्यांचा विश्वासच बसला नाही.
2017 पासून बेघर
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, लुसिया 2017 पासून बेघर आहेत. त्या निवाऱ्यासाठी इकडे तिकडे भटकत होत्या. जेव्हा त्यांनी लॉटरी जिंकली व त्यांना पैसे घेण्यासाठी बोलावण्यात आलं, तेव्हा त्यांची परिस्थिती समजल्यानंतर तेथे उपस्थित असलेले लोकही थक्क झालं. लुसिया यांनी सांगितलं, ‘6 वर्षांपूर्वी जेव्हा मी बेघर झाले, तेव्हा माझ्यासारख्या व्यक्तीसोबत असं काही घडेल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण देव सर्व पाहत असतो.
माझ्याकडे पैसे नव्हते, त्यामुळे मी लॉटरी खरेदी करण्यासाठी पैसे वापरणे कधीच योग्य मानलं नाही. पण एक दिवस अचानक वाटले की, लॉटरीचं तिकीट विकत घ्यावं, कदाचित नशीब बदलेल. त्यानंतर मी कॉन्ट्रा कोस्टा काउंटीमधील वॉलमार्ट स्टोअरमध्ये तिकीट खरेदी केलं.’
डोळे मिटून तिकीट काढलं
लुसिया यांनी पुढं सांगितलं, ‘तिकीट खरेदीसाठी गेल्यानंतर मी शांत राहिले, व मग डोळे मिटून तिकीट निवडलं. नंतर कळले की मी भाग्यवान विजेता ठरलेय.’ लुसिया आता या पैशातून सर्वात प्रथम घर घेण्याचा विचार करीत आहेत. त्यानंतर लग्न करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांनी लग्नासाठी वर शोधण्यास सुरुवात केलीय. दरम्यान, लॉटरी अधिकाऱ्यांनी लुसिया यांच्याबाबत फारसी माहिती दिली नाही. याबाबत प्रवक्त्या कॅरोलिन बेकर म्हणाल्या,’यासारख्या यशोगाथा लॉटरीच्या खेळाचा विजेत्यांवर सकारात्मक परिणाम दर्शवतात.’
दरम्यान, एखाद्याचं नशिब केव्हाही बदलू शकते, याचे हे उत्तम उदाहरण आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.