कराची 31 मे : आर्थिक संकटासोबतच राजकीय अनागोंदीचा सामना करणाऱ्या पाकिस्तानबाबतच्या अजब घटना सतत समोर येत आहेत. त्यांच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे मंगळवारी त्यांना मोठ्या अपमानाला सामोरे जावं लागलं, जेव्हा एका मोठ्या इस्लामिक देशाने कर्ज न भरल्याबद्दल त्यांचं प्रवासी विमान ताब्यात घेतलं. कर्जाची परतफेड होईपर्यंत हे विमान सोडलं जाणार नाही, असा इशारा त्या इस्लामिक देशाने दिला.
पाकिस्तानी वेबसाइट समा टीव्हीनुसार, पाकिस्तानने मलेशियाकडून बोईंग 777 विमान लीजवर घेतलं आहे. परंतु पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइनने (PIA) कराराच्या अटींनुसार मलेशियाला $4 दशलक्ष जमा केले नाहीत. त्यावर मलेशिया सरकारने न्यायालयात खटला दाखल केला. लीजची रक्कम न भरल्याबद्दल न्यायालयाने विमान जप्त करण्याचे आदेश दिले.
वृत्तानुसार, मंगळवारी विमान मलेशियाची राजधानी कुआलालामपूर येथे उतरलं, तेव्हा तेथील सरकारी अधिकाऱ्यांनी विमानाला घेरलं आणि ते आपल्या ताब्यात घेतलं. यानंतर पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइनच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं की जोपर्यंत लीजची रक्कम जमा होत नाही तोपर्यंत त्यांना विमान परत मिळणार नाही.
पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना महामारीमुळे विमान वाहतूक उद्योगावर झालेल्या परिणामामुळे आता पुरेसे प्रवासी मिळू शकत नाहीत. यासोबतच वैमानिकांच्या पात्रतेवरही प्रश्न उपस्थित केल्यामुळे आता देशातील आणि जगातील प्रवासी विमानात बसण्यास टाळाटाळ करत आहेत, त्यामुळे पीआयएला आपला खर्चही काढणं कठीण होत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मलेशिया सरकारने यापूर्वीही एकदा असंच पाकिस्तानचं विमान जप्त केलं होतं. नंतर जेव्हा पाकिस्तान एअरलाइनने त्यांना लीजची रक्कम दिली तेव्हा त्यांचं विमान सोडण्यात आलं. पाकिस्तानसाठी ही बातमी अशा वेळी आली आहे, जेव्हा तिथे लष्कर, न्यायव्यवस्था आणि राजकीय पक्षांमधील संघर्ष तीव्र झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.