नेहाल भुरे, प्रतिनिधी
भंडारा, 21 मे : तुमच्या शेतात सारस पक्ष्याचे घरटे असेल तर तुमचे शेत वनकायद्याने पडीक राहणार, अशी भिती वाटत असेल तर घाबरू नका. सारस पक्षी शेतात आढळलेल्यां शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. तुमच्या शेतात सारस पक्ष्याचे बस्तान असल्यास तुम्हाला 10 हजार रूपये मिळणार आहे. होय हे खरं आहे. भंडारा गोंदिया जिल्ह्यात सारस पक्षी संवर्धन करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने 62 कोटींचा प्रकल्प उभारण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी राज्य सरकार तयारी करीत आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील बिनाखी, सुकळी नकुल, गोंदेखारी, वाहनीच्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुक्यात बिनाखी, सुकळी नकुल, गोंदेखारी, वाहनी गावातील शेतशिवारात सारस पक्षाचे जोडपे आढळले आहे. आता शेती म्हटलं की रासायनिक खते, औषधं आलेच. मात्र, हे सर्व सारस पक्षांसाठी घातक आहेच. दिवसेंदिवस सारस पक्षांच्या संख्येत घट होत आहे. सारस पक्षी हा जोडीने राहत असतो, एक जोडीदार मृत झाला की दुसरा पक्षी सुध्दा मृत होतो. प्रेमाचं प्रतीक म्हणुन सारस पक्षांची ओळख आहे. सारस पक्षांचा अधिवास भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील शेतात आढळून येत आहे. त्यामुळे सारस पक्षाच्या संखेत वाढ व्हावी यासाठी सरकारने पुढाकार घेत ज्या शेतकऱ्यांच्या शेतात सारस पक्ष्यांचे घरटे आहेत अश्या शेतकऱ्यांना 10 हजार रुपये देण्यात येणार असल्याचा निर्णय घेतल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्याचा फायदा सारस भागातील शेतकऱ्यांना होणार आहे.
दुसरीकडे सारस पक्षी ज्या शेतात आढळला त्या भागाला वनकायदे लागू होत असल्याने आपली जमीन पडीक राहणार अशी भिती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होती. मात्र, सरकारच्या या निर्णयाने शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे. त्यामुळे आपले आर्थिक नुकसान होणार नसल्याने शेतकरी सुद्धा सारस संर्वधनात सहभागी झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.