प्रतापगढ, 8 मे : एखाद्या कुटुंबातील एक व्यक्ती आयएएस, आयपीएस किंवा पीसीएस अधिकारी झाली की, ते कुटुंब संपूर्ण चर्चेत येतं. कारण, त्या एका व्यक्तीमुळे कुटुंबाचा देखील मान-सन्मान वाढतो. अशा परिस्थितीमध्ये जर एखाद्या कुटुंबातील सर्व भावंडं आएएस आणि आयपीएस अधिकारी असतील तर? अशा कुटुंबाची तुम्ही क्वचितच कल्पना केली असेल की ज्या कुटुंबातील चार सख्खी भावंडं आएएस-आयपीएस आहेत. पण, उत्तर प्रदेशात एक कुटुंब असं आहे ज्यातील चारही भाऊ-बहीण सनदी अधिकारी आहेत.
उत्तर प्रदेशातील प्रतापगढ येथील मिश्रा कुटुंबातील ही भावंडं आहेत. कुटुंब प्रमुख अनिल मिश्रा आपल्या कुटुंबासह दोन खोल्यांच्या घरात राहत होते. त्यांना योगेश, लोकेश, माधवी आणि क्षमा नावाची चार मुलं आहेत. अनिल मिश्रा हे ग्रामीण बँकेत व्यवस्थापक होते. चारही मुलांनी मोठं होऊन अधिकारी व्हावं आणि आपलं नाव मोठं करावं, अशी त्यांची नेहमीच इच्छा होती. म्हणूनच त्यांनी मुलांना सुरुवातीपासूनच खूप मेहनतीनं शिकवलं. त्यांची सर्व मुलं अभ्यासात हुशार होती.
सर्वप्रथम मोठा मुलगा योगेश याने नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली. यानंतर हळूहळू सर्वांनी मोठ्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवलं आणि त्यांनीही परीक्षेची तयारी सुरू केली. सर्वात अगोदर 2013मध्ये योगेश आएएस अधिकारी झाले. मोठ्या भावाच्या यशानंतर उर्वरित तीन भावडांना स्फुर्ती मिळाली आणि त्यांनी अधिक मेहनत घेऊन तयारी सुरू केली. पुढच्याच वर्षी म्हणजे 2014 मध्ये माधवी यांनी ऑल इंडिया 62वा रँक मिळवली.
यानंतर दुसरा भाऊ लोकेश यांनी 2015 मध्ये 44व्या क्रमांकासह यश संपादन केलं आणि ते आयएएस झाले. लोकेश यांनी आयआयटी दिल्लीतून इंजिनीअरिंग केलं होतं. त्यांनी आपला भाऊ योगेश प्रमाणं समाजशास्त्र हा ऑप्शनल विषय घेऊन यश मिळवलं. चार भावंडांपैकी सर्वांत लहान असलेल्या क्षमा मिश्रा यांनी 2015 मध्ये यूपीएससी परिक्षेत 172 रँक मिळवली. क्षमा आयपीएस अधिकारी आहेत. अशा प्रकारे तीन वर्षांत एकाच कुटुंबातील चारही भावंडं आयएएस-आयपीएस अधिकारी झाले.
यूपीएससी परीक्षा ही जगातील सर्वांत कठीण परीक्षांपैकी एक आहे. ती उत्तीर्ण होण्यासाठी अभ्यासाबरोबरच जिद्द, चिकाटी आणि सातत्याची गरज असते. काहीजण तर अर्ध्यातच तयारी सोडूनदेखील देतात. मात्र, मिश्रा भावंडांनी परिश्रम घेऊन अशक्य गोष्ट साध्य करून दाखवली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.