नीरज कुमार, प्रतिनिधी
बेगुसराय, 30 मे : मे महिना सुरू आहे, एकीकडे विद्यार्थ्यांची उन्हाळी सुट्टी तर दुसरीकडे घराघरांमध्ये लग्नसराई सुरू आहे. लग्न म्हटलं की, नुसती लगबग आणि घाई-गडबड असते. लग्नखरेदीचे गणित मांडता मांडता यजमानांना जवळपास घाम फुटतो. करावा तितका खर्च कमीच पडतो. मात्र तुम्हाला माहितीये? आपल्या देशात एक असे मंदिर आहे, जिथे चक्क मोफत पण थाटामाटात लग्न लावले जाते. आजही हुंड्यासाठी लढणाऱ्या बिहारवासीयांसाठी हा एक सुटकेचा निःश्वास आहे, असे म्हणायला हरकत नाही. बिहारची आर्थिक राजधानी म्हटल्या जाणाऱ्या बेगुसरायच्या बसही भागातील शिव मंदिरात ही मोफत लग्नसोहळ्याची जनहितार्थ परंपरा तब्बल 20 वर्षांपासून जपली आहे.
सध्या बॉलिवूडपासून ते सर्वसामान्यांपर्यंत ‘डेस्टिनेशन वेडिंग’ लोकप्रिय होत आहे. लग्नसोहळ्यांच्या यासारख्याच अनेक मॉडर्न संकल्पना समाजात रुजत आहेत. मात्र असे असतानाही, अनेक तरुणमंडळी अतिशय साध्या पद्धतीने घरच्या घरी किंवा देवळात लग्नगाठ बांधणेही पसंत करतात. म्हणूनच बिहारच्या शिव मंदिरात मोफत थाटामाटात लग्न लावून दिले जाते, ही बाब फार आश्चर्यकारक आणि तितकीच सुखद आहे. गरीब जनतेला कोणत्याही चिंतेविना आपल्या मुलांची लग्न करता यावी, त्यात नातेवाईक, मित्रमंडळींना सहभागी करून घेता यावे, यासाठी एक मदत म्हणून या मंदिर समितीने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच समितीकडून वधू-वरासाठी भरजरी कपड्यांपासून ते वऱ्हाड्यांसाठी गोडा-धोडाच्या जेवणापर्यंत सगळा खर्च केला जातो.
विशेष म्हणजे, या मंदिरात लग्न झालेल्या जोडप्यांचा संसार सुखाचा होतो आणि लग्नानंतर काही दिवसांतच गोड बातमी कळते, असा येथील भाविकांचा मानस आहे. त्यामुळे अनेकांचा या मंदिरात लग्नगाठ बांधण्याकडे कल असतो.
मंदिर समितीचे सदस्य जगन्नाथ पासवान यांनी दिलेल्या माहितीनुसार, याठिकाणी तब्बल १०० वर्षांपासून हे शिव मंदिर वसलेले आहे. २००७ साली आलेल्या महापुरात मंदिर परिसरातील सर्व घरांचे प्रचंड नुकसान झाले परंतु मंदिराला जराही धक्का बसला नव्हता. त्यामुळे येथे खरोखरच भगवान शिव यांचा वास आहे, असा विश्वास दृढ झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.