ग्रीस, 11 एप्रिल : मूल जन्माला आल्याबरोबरच त्याला आजूबाजूला राहणाऱ्या स्त्रिया व पुरुषांची ओळख होते. त्यामुळे पुरुषांना किंवा स्त्रियांना कधीही न पाहिलेली व्यक्ती सापडणं दुर्मीळच म्हणावं लागेल; पण अशी एक दुर्मीळ व्यक्ती या जगात होऊन गेली आहे. तब्बल 82 वर्षांचं जीवन जगूनही त्यांनी स्त्री कशी असते, हे कधी पाहिलंच नाही.
या व्यक्तीचं आयुष्य एखादी काल्पनिक कथा असल्याप्रमाणे वाटेल; मात्र खरोखरच त्यांनी त्यांच्या आयुष्यात एकदाही महिलेला पाहिलं नाही. वयाच्या 82व्या वर्षी त्यांचं निधन झालं; मात्र आयुष्यभर ते स्त्रियांना एखाद्या काल्पनिक कथेचा भाग समजत राहिले. ग्रीसमधल्या हल्कीदिकी इथले ते रहिवासी होते. त्यांनी पुस्तकं वाचून व सहकाऱ्यांच्या गोष्टी ऐकूनच स्त्रियांबद्दलची माहिती मिळवली; मात्र आयुष्यात एकदाही त्यांनी स्त्री कशी असते हे पाहिलं नाही.
युनिलँडच्या रिपोर्टनुसार, मिहेलो टोलोटोस असं त्यांचं नाव होतं. 1856मध्ये त्यांचा जन्म झाला होता. जन्मानंतर लगेचच त्यांची आई गेली. अनाथ टोलोटोस यांना माउंट एथोस इथं राहणाऱ्या एका रूढीवादी भिक्षूंनी सांभाळलं. त्यांचे नियम खूप कडक होते. स्त्रियांना तिथे जाण्याची परवानगी नव्हती. गाय, बकरी अशा पाळीव प्राण्यांनाही मज्जाव होता. दहाव्या शतकापासून तिथे हेच नियम लागू आहेत. आजही ते तसेच पाळले जातात.
स्कर्ट घाल, दारू पी, सिगारेट ओढ; तरुणी म्हणते असं सासर नको गं बाई, शेवटी…
माउंट एथोसमध्ये असे नियम असण्यामागे तिथल्या भिक्षूंनी लग्न करू नये असा उद्देश होता; मात्र हे भिक्षू जगभरात फिरू शकत होते. लोकांशी संवाद साधू शकत होते. असं असलं तरी टोलोटोस हे कधीच मठातून बाहेर गेले नाहीत. 1938मध्ये वयाच्या 82व्या वर्षी त्यांचं निधन झालं. इतरांप्रमाणेच त्यांचाही अंत्यविधी करण्यात आला; मात्र तिथले लोक असं म्हणतात, की ते अशी एकमेव व्यक्ती होते, ज्यांना स्त्रिया कशा दिसतात हे माहीतच नव्हतं. त्या काळात टोलोटोस यांच्या निधनाच्या वृत्ताला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. एका वृत्तपत्रात त्यांच्याबद्दल लिहून आलं होतं. त्यात असं म्हटलं होतं, की टोलोटोस यांनी कधीही न पाहिलेल्या गोष्टींमध्ये केवळ स्त्रियाच नव्हत्या, तर कार, विमान किंवा चित्रपटही त्यांनी कधीही पाहिला नव्हता.
‘ग्रीसमध्ये एक साधू एकाही महिलेला न पाहताच गेले’ असं वृत्त एडिंबरा डेली कुरियर वृत्तपत्राने 29 ऑक्टोबर 1938 रोजी दिलं होतं. आज माउंट एथोसला जागतिक वारसास्थळाचा दर्जा मिळाला आहे. दर वर्षी तिथे हजारो पर्यटक येतात. त्यातले काही तिथल्या आध्यात्मिक परंपरांना आपलंसं करतात; मात्र आजही तिथे महिलांना प्रवेश नाही. त्याबाबत अलीकडेच काही प्रश्न उपस्थित झाले होते. हा भेदभाव असल्याचंही म्हटलं जात होतं; मात्र मठाने त्यांचे नियम बदलले नाहीत. या संप्रदायाचे जगभरात 20 मठ आहेत. त्यापैकी ग्रीसमध्ये 17 आणि इतर 3 सर्बिया, बल्गेरिया आणि रशियामध्ये आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.