मुंबई,
रशिया आणि युक्रेनमध्ये सध्या भयंकर युद्ध सुरू आहे. याचे पडसाद संपूर्ण जगावर उमटताना दिसून येत आहेत. तसंच युक्रेनवर याचे गंभीर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. युक्रेनमधील अनेक इमारती मिसाईल हल्ल्यात नेस्तनाबूत झाल्या आहेत. दरम्यान, युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी अडकल्याने त्यांना मायदेशी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत भारताने केवळ 900 विद्यार्थी मायदेशी आणले आहेत. मात्र, त्यातही श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. या श्रेयवादाच्या लढाईवर काँग्रेसे नेते विजय वडेट्टीवार यांनी खोचक टीका केली आहे. युक्रेनमध्ये 30 हजार विद्यार्थी अडकले आहेत. त्यापैकी फक्त 900 मुलांना परत आणलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारने फार मोठा तीर मारला नाही, अशी खोचक टीका करतानाच केंद्र सरकारने या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधताना केंद्रावर थेट हल्ला चढवला. युद्धजन्य परिस्थितीत इतर देशांनी आपले नागरिक मायदेशी नेले, आपण मात्र लवकर पावलं उचलली नाही. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्याची गरज आहे. युक्रेनमध्ये 25 ते 30 हजार मुलं आहेत. 40 किमी प्रवास करून गेल्यानंतर थंडीत ते उघड्यावर झोपले. दोन विमाने आले म्हणजे सर्व विद्यार्थी आले असं होत नाही. विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी आणखी प्रयत्न करावे लागेल, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.